पांढऱ्या-निळ्या रंगसंगतीत धावणारी आणि मुंबई-पुणे या दोन शहरांना एकमेकांशी जोडणारी ऐतिहासिक गाडी म्हणजे डेक्कन क्वीन! १९३०मध्ये सुरू झालेल्या या पहिल्यावहिल्या डिलक्स गाडीत कालानुरूप अनेक बदल झाले. मात्र आता या गाडीचे आणखी एक वैशिष्टय़ नामशेष झाले आहे. प्रवाशांना धावत्या उपाहारगृहाचा आनंद देणारी या गाडीतील ‘डायनिंग कार’ आता बंद करण्यात आली आहे. या डब्याचे आयुर्मान संपल्याने हा डबा बाद करण्यात आला आहे.
चिकन कटलेट, चीज टोस्ट सँडविच, बेक्ड बीन्स आणि ब्रेड बटर, पापलेट ब्रेड असे अनोखे आणि ताजे पदार्थ या उपाहारगृहात मिळत होते. या उपाहारगृहातील मऊ गाद्यांच्या लाकडी खुच्र्या, तशीच लाकडी टेबले यांचा एक वेगळा थाट होता. मात्र या डब्याचे आयुर्मान संपल्यानंतर आता हा डबा रेल्वेने बाजूला काढला आहे. त्या जागी इतर गाडय़ांमध्ये असतो तसा ‘रसोई याना’चा डबा या गाडीला जोडण्यात आला आहे. एका प्रवाशाने माहितीच्या अधिकाराखाली रेल्वेला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मध्य रेल्वेने ही माहिती दिली आहे. रेल्वेच्या म्हणण्याप्रमाणे या रसोईयानातही प्रवाशांना मागणीप्रमाणे पदार्थ बनवून देण्यात येतील. मात्र उपाहारगृहाचा थाट नसल्याने प्रवाशांना आता आपापल्या जागांवर बसून ते पदार्थ मांडीवर ठेवून खाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
याबाबत मध्य रेल्वेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, हा डबा देखभाल-दुरुस्तीसाठी गेला असून तो लवकरच परत सेवेत आणला जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र मध्य रेल्वेने माहितीच्या अधिकाराखाली दिलेले उत्तर आणि या अधिकाऱ्यांचे उत्तर यात तफावत असल्याने संभ्रमाची परिस्थिती आहे. तूर्तास तरी डेक्कन क्वीनने नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या लाडक्या ‘धावत्या उपाहारगृहा’वाचूनच प्रवास करावा लागणार आहे. शहरांतर्गत धावणाऱ्या या गाडीतील प्रथम श्रेणीचा डबा स्वातंत्र्यानंतर लगेचच बंद करून त्याजागी द्वितीय श्रेणीचा डबा सुरू करण्यात आला. सुरुवातीला पूर्ण निळ्या रंगाच्या या गाडीला पांढऱ्या-निळ्या अशा नेत्रसुखद रंगसंगतीची जोड देण्यात आली. त्याचप्रमाणे १९५५मध्ये पहिल्यांदाच या गाडीत तृतीय श्रेणीचा डबाही जोडण्यात आला. त्यानंतर २००३पासून या गाडीतील पाच वातानुकूलित डब्यांची संख्या चारवर आणण्यात आली. गाडीतील आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे धावते उपाहारगृह! तूर्तास ते इतिहासजमा झाले आहे.