scorecardresearch

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना साडेसात लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्याचा निर्णय

मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलातही राज्य शासनाने आता ७०० कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

Chandiwal Commission summons Maharashtra Min Nawab Malik
()

मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम  शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत सध्या एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरिता पाच लाख रुपये इतकी कर्जमर्यादा आहे, ती वाढवून आता साडेसात लाख रुपये इतकी करण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्य शासनाच्या भागभांडवलामधून राबविल्या जाणाऱ्या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेसाठी सध्या असलेली अडीच लाख रुपयांची कर्जमर्यादा वाढवून आता ती पाच लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. यामुळे एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुरेसे शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार असून त्यांचा शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.

मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलातही राज्य शासनाने आता ७०० कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत आहे. यापुढील काळातही महामंडळाच्या विविध योजनांसाठी अल्पसंख्याक  विकास विभागामार्फत संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल, असे मलिक यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Decision give educational loan rs seven and a half lakhs to minority students akp

ताज्या बातम्या