मुंबईत दुधाच्या मागणीत घट

किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान

करोनाची दुसरी लाट धडकल्यानंतर नागरिकांनी शहराबाहेर पडण्यासाठी सुरू के लेली धडपड आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकारने लागू के लेल्या कठोर निर्बंधांमुळे मुंबईतील दुधाची मागणी आटली. त्यामुळे दुधाचा जीवनावश्यक घटकांत समावेश असूनही दूध विक्रेत्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.

चहाच्या टपऱ्यांबरोबर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मिठाई उत्पादक हे दुधाचे मोठे ग्राहक आहेत. चहा, लस्सी, पनीर तयार करण्यासाठी दूध लागते. अलीकडे पनीर बाहेरून मागवले जात असले तरी चहासाठी मध्यम स्वरूपाच्या हॉटेलला दिवसाला दीडशे ते दोनशे लिटर दूध लागते. निर्बधांमध्ये हॉटेल फक्त पार्सल सेवेसाठी सुरू आहेत. त्यामुळे सध्या तेथे चहा क्वचितच के ला जातो. त्यामुळे हॉटेलचालकांची दुधाची मागणी जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाल्याचे ‘आहार’चे माजी अध्यक्ष, हॉटेल व्यावसायिक आदर्श शेट्टी यांनी सांगितले. मिठाई विक्रीस निर्बंधांतून मुभा असली तरी बहुतांश व्यावसायिकांनी करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती, ग्राहकांचा कल लक्षात घेऊन उत्पादन बेतानेच सुरू ठेवले असल्याचे ‘चांदेकर स्वीट्स’चे राजेंद्र खांबकर यांनी सांगितले.

‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मुंबई, पुण्यातील दुधाची मागणी सुमारे २५ ते ३० हजार लिटरने कमी झाल्याचे स्पष्ट के ले. मात्र मागणीतील ही तूट नागरिकांमुळे नसून दूध आवश्यक असलेल्या व्यवसायांवरील निर्बंधांमुळे निर्माण झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. या शहरांमधील दुधाची मागणी कमी झाली असली तरी संकलनावर परिणाम झालेला नाही. अतिरिक्त दूधसाठ्याचा वापर भुकटी, पनीर आदी दुग्धजन्य पदार्थांसाठी के ला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अंधेरीतील ‘श्रीनाथ डेअरीचे मालक पुष्कर पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्बंधांपूर्वी गाय व म्हशीचे मिळून दिवसाला २०० लिटर दूध विकले जात होते. मात्र ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याने दिवसाची ४० ते ५० लिटर दुधाची मागणी कमी झाली. अनेक घरांनी दूध बंद केले. तर अनेक इमारतींमध्ये दूध घरपोच करणाऱ्या डेअरी कामगारांना प्रवेश नाकारला आहे. अशीच परिस्थिती शहरातील बहुतांश डेअरी व्यावसायिकांची आहे.

परराज्यातील पाकीटबंद दुधाला मागणी

दुग्धजन्य उत्पादनाच्या क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे पाकीटबंद (टेट्रा पॅक) दूध मिळते. त्यावर प्रक्रिया केलेली असल्याने ते तुलनेने अधिक टिकते. त्यामुळे स्थानिक डेअरीतील दूधाला असलेली मागणी घटली असली तरी या स्वरूपात विक्री होणाऱ्या दूधाला मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले. त्याचप्रमाणे बहुतेक मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये या स्वरूपातील दूधकुप्यांची उपलब्धता अधिक प्रमाणात असते. डिपार्टमेंटल स्टोअर्स सध्या सामान घरपोच करत आहेत, त्यात हे दूध दिले जाते. त्याचबरोबर टाळेबंदी जाहीर होण्याच्या भीतीने लाखो परप्रांतीय श्रमिकांनी शहर सोडले. उर्वरित शहर, राज्य सोडण्याच्या धडपडीत आहेत. मुंबईत स्थायिक असलेले अनेक नागरिकही कु टुंबासह शहर सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. कठोर निर्बंधांमुळे हजारोंच्या संख्येत असलेल्या चहाच्या टपऱ्या, हॉटेल बंद आहेत. परिणामी शहरातील दुधाची मागणी आटू लागली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Decline in milk demand in mumbai abn

ताज्या बातम्या