मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन
यवतमाळ जिल्ह्यतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्य सरकार करीत असलेल्या विविधांगी उपाययोजनांमुळे गेल्या तीन महिन्यात निम्म्याने कमी झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी केले. ‘बळीराजा चेतना अभियान’ सह अनेक उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यात यश मिळाले असल्याचे खडसे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न गंभीर झालेला असताना यवतमाळ जिल्ह्यात हे प्रमाण घटले असल्याने सरकारची पावले योग्य दिशेने पडत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी पहिल्या तीन महिन्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यत ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावर्षी हा आकडा ४८ इतका खाली आला आहे. म्हणजे आत्महत्यांचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे खडसे यांनी सांगितले. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात यवतमाळमध्ये ८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर यावर्षी २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. फेब्रुवारीत गेल्यावर्षी ३८ तर यावर्षांत १४ तर मार्चमध्ये गेल्यावर्षी २८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, यावर्षी १४ शेतकऱ्यांनी केल्या, अशीही माहिती त्यांनी दिली.

चेतना अभियान
शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नयेत, यासाठी यवतमाळ जिल्ह्यत २४ जुलै २०१५ रोजी बळीराजा चेतना अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारने ३२ कोटी रुपये अनुदान दिले असल्याचे खडसे यांनी सांगितले. यवतमाळ व उस्मानाबाद हे जिल्हे पुढील काळात शेतकरी आत्महत्या मुक्त होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस व खडसे यांनी व्यक्त केला.

जालन्यात ३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
जालना : गेल्या सव्वातीन महिन्यांत जिल्ह्य़ात ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पैकी १८ प्रकरणे शासकीय मदत देण्यासाठी प्रलंबित आहेत. या प्रकरणात जिल्हा प्रशासनास मदत देण्यासाठी रासायनिक परीक्षण अहवालाची प्रतीक्षा आहे. ३६ पैकी १० प्रकरणे मदतीस पात्र, तर ८ अपात्र ठरविण्यात आली.
जानेवारीत १६, फेब्रुवारी ९ व मार्चमध्ये ६ शेतक ऱ्यांनी, तर एप्रिल महिन्यात आतापर्यंत ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली. गेल्या वर्षी ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ७१ प्रकरणे मदतीस पात्र ठरविण्यात आली, चौकशीसाठी ८ प्रकरणे प्रलंबित आहेत. २०१५ मधील शेतकरी आत्महत्येची चार प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी विजयकुमार फड यांनी पत्रकारांना सांगितले.