मुंबईतल्या दहशतवाद्याच्या अटकेवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,”अशा लोकांना…”

देशाच्या विविध भागांमध्ये आणि विशेषतः मुंबईत दहशतवादी सापडणं ही धोक्याची घंटा आहे, असंही ते म्हणाले.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानने फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांनी ६ जणांना अटक केली आहे. यातल्या एका दहशतवाद्याला मुंबईतून अटक करण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एकाचं मुंबई कनेक्शन आता प्रकाशात आलं आहे. एवढंच नाही तर दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ही फारच गंभीर गोष्ट आहे. देशाच्या विविध भागांमध्ये आणि विशेषतः मुंबईत दहशतवादी सापडणं ही धोक्याची घंटा आहे. मला वाटतं की ह्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढणं खूप गरजेचं आहे आणि पुन्हा असं काही घडू नये याची काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांना संपवूनच टाकायला हवं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Devendra fadnavis on mumbai terrorist delhi police anti terrorist squad vsk