ठाण्यानंतर दिघा स्थानक प्रस्तावित; ठाणे-दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिकाही

पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी आणि गोरेगाव यांदरम्यान लवकरच ‘राम मंदिर’ हे नवीन स्थानक सुरू होणार असताना आता मध्य रेल्वेवरही एक नवे स्थानक येऊ घातले आहे. मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि ऐरोली यांदरम्यान दिघा हे नवीन स्थानक प्रस्तावित आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील (एमयूटीपी-३) कळवा-ऐरोली जोडमार्ग या प्रकल्पात या स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे-दिवा यांदरम्यानची पाचवी-सहावी मार्गिका आणि हा प्रकल्प एकाच वेळी होणार असल्याची माहितीही मुंबई रेल्वे विकास महामंडळातील (एमआरव्हीसी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर सध्या ठाणे, ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे आणि तुर्भे ही स्थानके आहेत. त्यापैकी ठाणे आणि ऐरोली या स्थानकांदरम्यानचे अंतर सर्वात जास्त आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या आयुक्तांनी ज्या दिघा येथील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईचा हातोडा उगारला होता, त्याच दिघा येथे हे नवीन स्थानक प्रस्तावित आहे. हे ठिकाण ठाणे आणि ऐरोली यांच्या मधोमध असल्याने येथील लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील तरतूद म्हणून या स्थानकाची निर्मिती होणार आहे.

कळवा-ऐरोली जोडमार्ग या प्रकल्पासाठी ४२८ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. एमयूटीपी-३ या योजनेत समाविष्ट असलेला हा प्रकल्प एमयूटीपी-२ या योजनेतील ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका या प्रकल्पाबरोबरच पूर्ण करण्याचा विचार सध्या एमआरव्हीसी व मध्य रेल्वे करत आहे. कळवा-ऐरोली प्रकल्पासाठी कळव्याहून अप व डाऊन धिम्या मार्गावरून ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गाकडे जाण्यासाठी रेल्वे पूल उभारण्यात येणार आहे. पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम करतानाच या कामाचे नियोजन करणे सोपे आहे. त्यामुळे ही दोन्ही कामे एकत्रच होतील, असे एमआरव्हीसीतील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या पूर्ततेसाठी एमआरव्हीसीने डिसेंबर २०१७ची अंतिम मुदत ठेवली होती. आता हे दोन्ही प्रकल्प एकत्रितपणे होत असल्यास ही मुदत पुढे जाण्याची शक्यता आहे.

अपघातांना आळा बसणार

या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून दिघा येथे नवीन स्थानक उभारले जाईल. सध्या दिघा येथील रहिवाशांना ऐरोली, कळवा किंवा ठाणे या स्थानकांपर्यंत रस्त्याने प्रवास करावा लागतो. यापैकी बहुतांश लोक विटावा येथून रुळांवरून चालत ठाण्याकडे जातात. त्यामुळे अनेक अपघातही होतात. हे नवे स्थानक झाल्यास या अपघातांनाही आळा बसण्याची शक्यता या अधिकाऱ्याने व्यक्त केली.