‘वादात अडकलेल्या भाजप मंत्र्यांनी राजीनामा द्यावा,’ असे अप्रत्यक्षपणे सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सूचित केल्याने सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात आरोप झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्र्यांना राजीनामे द्यायला सांगून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, याची आठवण त्यांनी करून दिली आहे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे या घडामोडींकडे पूर्ण लक्ष असून ते योग्य वेळी आपली भूमिका जाहीर करतील, असे खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
भाजपचे मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्याने शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. भाजप मंत्र्यांच्या राजीनाम्याची थेट मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली नसली तरी आधीच्या युती सरकारच्या काळात या प्रसंगात शिवसेनेने कोणती पावले उचलली, याचा संदर्भ शिवसेना नेत्यांनी दिला आहे. जर गैरव्यवहार नसेल, तर चौकशीला सामोरे जाण्यासाठी भाजपचे मंत्री का घाबरत आहेत, असा त्यांचा सवाल आहे. युती सरकारच्या काळात गैरव्यवहाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि चौकशीनंतर त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात आला. पारदर्शी कारभाराची हमी देणाऱ्या भाजपने आपल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यावर आता चौकशीसाठी टाळाटाळ का चालविली आहे, असा सवाल विचारण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणांमध्ये शिवसेनेची भूमिका ठाकरे लवकरच मांडतील, असे राऊत यांनी सांगितले. या प्रकरणांमधून अजून कोणताही गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झालेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disputed bjp leaders should quits say sanjay raut
First published on: 01-07-2015 at 03:39 IST