मात्र, कल्याणपल्याडच्या गाडय़ांमुळे गर्दीतून सुटका नाहीच

दिवा स्थानकात जलद गाडय़ा थांबण्यासाठी आवश्यक असलेली सगळी कामे झाली असून आता १० डिसेंबपर्यंत या स्थानकावर जलद गाडय़ा थांबवण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. या गाडय़ांची यादीही तयार झाली असून त्यात अप मार्गावरील १२ आणि डाउन मार्गावरील १२ अशा २४ गाडय़ांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यापकी एकही गाडी कल्याणहून सुटणारी किंवा कल्याणपर्यंत धावणारी नाही. या गाडय़ा कसारा, कर्जत, टिटवाळा, बदलापूर या स्थानकांवरून येणाऱ्या असल्याने दिवावासीयांना गर्दीने भरलेल्या गाडय़ांतच स्वत:साठी जागा शोधावी लागणार आहे.

दिवा स्थानकात झालेल्या आंदोलनानंतर या स्थानकात जलद गाडय़ांना थांबा दिला जाईल, असे रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात या आंदोलनाचा आणि जलद गाडीच्या थांब्याचा एकमेकांशी काहीच संबंध नसल्याचे समोर आले होते. हे काम म्हणजे ठाणे-दिवादरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाचाच एक भाग असल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या चार मोठय़ा ब्लॉकपकी शेवटचा ब्लॉक २३ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला. या घटनेला महिना उलटून गेला, तरी अद्याप दिवा स्थानकात जलद गाडय़ा थांबलेल्या नाहीत.

दिवा येथे जलद गाडय़ा थांबण्यासाठी आवश्यक अशी प्लॅटफॉर्म व सिग्निलग यंत्रणेसंबंधीची कामे पूर्ण होत असल्याने विलंब लागत असल्याचे मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले. आता ही कामे अंतिम टप्प्यात असून १० डिसेंबपर्यंत जलद गाडय़ांचा थांबा सुरू होईल, असेही या अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर स्पष्ट केले. त्यासाठी तिकीट यंत्रणा, प्लॅटफॉर्मवरील उद्घोषणा, गाडीतील उद्घोषणा, प्लॅटफॉर्मची तपासणी आदी गोष्टींसाठी संबंधित विभागीय प्रमुखांना सूचना देण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने दिलेल्या मान्यतेनुसार सध्या दिवा स्थानकात अप आणि डाऊन मार्गावर १२ जोडय़ा म्हणजेच २४ सेवा चालवल्या जाणार आहेत. या सकाळच्या गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या चार सेवांचा समावेश आहे. या सेवा अनुक्रमे कसारा, अंबरनाथ, खोपोली आणि कसारा येथून सुटणार आहेत. तर डाऊन दिशेला संध्याकाळी दिवा येथे थांबणाऱ्या चार सेवांमध्ये कसारा, बदलापूर, टिटवाळा आणि कर्जत या सेवांचा समावेश आहे.

सध्या दिवा स्थानकात या २४ सेवांपेक्षा जास्त सेवा थांबवणे शक्य नाही. ठाणे-दिवा यांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतरच येथे थांबणाऱ्या गाडय़ांची संख्या वाढवणे शक्य असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. आता १० डिसेंबपर्यंत दिवा येथील थांब्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान मध्य रेल्वेसमोर असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

समस्या काय येणार?

या गाडय़ा कर्जत, कसारा, खोपोली, टिटवाळा, बदलापूर, आसनगाव, अंबरनाथ अशा ठिकाणांहून सुटणार किंवा अशा ठिकाणी जाणार आहेत. आधीच या गाडय़ांना डोंबिवली, कल्याण, ठाणे येथील प्रवाशांमुळे प्रचंड गर्दी असते. त्यात या गाडय़ा दिवा स्थानकात थांबवल्या, तर आधीच भरपूर गर्दी असलेल्या गाडय़ांमध्ये लोकांना चढणे शक्य होणार नाही. त्यात दरवाज्यावरील गर्दीत भर पडेल. दिवा येथे प्लॅटफॉर्म ज्या ठिकाणी येणार आहे, त्याच ठिकाणी ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म येतो. त्यामुळे ठाण्याला चढणाऱ्या वा उतरणाऱ्या प्रवाशांसह संघर्ष होणार आहे. त्यातून अपघात वाढण्याची शक्यता आहे.