दिवाळी असूनही निवडणुकांमुळे आणि रविवारच्या निकालांमुळे काहीशा आक्रसलेल्या दिवाळी खरेदीला सोमवारपासून पुन्हा एकदा उधाण आले होते. क्रॉफर्ड मार्केटचा परिसर असो किंवा दादर, मालाड, बोरीवली, ठाणे येथील बाजारपेठा, सगळीकडे ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
घरच्या सजावटीसाठी लागणारी दिव्यांची तोरणं, दिवाळी आणि भाऊबीजेसाठी द्यायच्या भेटवस्तू, कपडे, स्वयंपाकघरातील वस्तू यांनी बाजार भरलेला आहे. याशिवाय रांगोळी, पणत्या, फटाके या दिवाळीसाठीच्या खास सामानाच्या खरेदीसाठीही गर्दी आहे. कित्येक तरुण मंडळी चॉकलेट्स, मिठाई, डेकोरेटीव्ह पणत्या भेट स्वरूपात देण्यास प्राधान्य देत असल्यामुळे या वस्तूंच्या खरेदीसाठीही तरुणांनी गर्दी केली होती. दादरच्या बाजारामध्ये ताज्या फुलांची तोरणे, गजरे, वेण्यासुद्धा दाखल आहेत.
रविवारी निवडणुकांच्या निकालामुळे सर्वाचे लक्ष दूरचित्रवाहिन्यांकडे खिळले होते. त्यामुळे सुट्टी असूनही लोकांनी घरी बसून निकाल पाहाणे पसंत केले. त्यामुळे सोमवारी दुपारपासूनच मुंबईमधील सर्व बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. गेल्या काही वर्षांपासून लोकांनी पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याकडे कल दिल्यामुळे फटाक्यांपेक्षा घरगुती सजावट, नातेवाईकांना देण्याच्या भेटवस्तू, कपडे यांच्या खरेदीला वाढती पसंती मिळाल्याचे दिसून आले.  फटाक्यांमध्येही आवाजी फटाक्यांपेक्षा विविध रंगांची उधळण करणाऱ्या फुलबाज्या, चक्रीफुले, पाऊस यांसारख्या फटाक्यांना लोकांनी जास्त पसंती दिलेली दिसून आली.
दिवाळी आली की, घराघरातून न चुकता कपडय़ांची खरेदी केली जाते. त्यामुळे दादरची कपडय़ांची दुकानेही आज गजबजलेली होती. याशिवाय दागिन्यांच्या दुकानांमध्येही महिलांची आणि तरुणींची गर्दी दिसून आली. थोडक्यात निवडणुकांच्या निकालानंतरच्या गंभीर वातावरणाला विश्रांती देत सोमवारी मुंबईकरांनी खरेदीमध्ये आपले मन रमवले.