देशातील सर्व प्रमुख बंदरांमधील गोदी कामगारांना मिळणाऱ्या बोनसच्या मर्यादेमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावास इंडियन पोर्ट असोसिएशनने मान्यता दिली आहे. बोनसची मर्यादा दीड ते दोन हजारांनी वाढविण्यात येणार असून ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या करारामध्ये वाढीव बोनसचा समावेश होण्याची शक्यता त्यामुळे वाढली आहे.
देशातील सर्व प्रमुख १२ बंदरांमधून बंदर आणि गोदी कामगारांच्या बोनसची मर्यादा वाढविण्यात यावी आणि सर्व बंदरांमधील कामगारांना समान बोनस मिळावा, अशी मागणी मान्यताप्राप्त पाच कामगार महासंघानी केली होती. मात्र पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला. त्याऐवजी प्रमुख बंदरांच्या सरासरीनुसार ५० टक्के आणि प्रत्येक बंदरांच्या उत्पादकतेवर ५० टक्के असा बोनसचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी मान्यताप्राप्त पाच संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक दिल्लीमध्ये गुरुवारी पार पडली. या बैठकीमध्ये बोनसची मर्यादा वाढविण्याची मागणी मान्य करण्यात आल्याचे ऑल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशन (वर्कर्स)चे सरचिटणीस अ‍ॅड. एस. के. शेटय़े यांनी सांगितले. ३५०० रुपयांची बोनसची असलेली मर्यादा २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षांंसाठी पाच हजार तर २०१४-१५ या वर्षांसाठी ५५०० रुपयांपर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली.
इंडियन पोर्ट असोसिएशनने मान्यता दिलेल्या या प्रस्तावाचा समावेश ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंतिम बोनस करारात होणार असून केंद्र सरकारने या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे शेटय़े यांनी सांगितले.