नियमभंग करीत फास्टॅग मार्गिकेतून प्रवास; ३० लाख रुपये महसूल

सुशांत मोरे, लोकसत्ता

मुंबई : वाहनावर फास्टॅग नसला किंवा तो रिचार्ज न केल्यास वाहन चालक फास्टॅग मार्गिकेतून जाऊ शकत नाही. मात्र जलद प्रवासासाठी असे वाहनचालक फास्टॅग मार्गिकेचा वापर करतात. त्यामुळे त्यांना दुप्पट पथकर (टोल) आकारला जातो. फास्टॅगची अंमलबजावणी झाल्यापासून (१५ डिसेंबर २०१९) ते आतापर्यंत राज्यात १८ हजार चालकांनी दुप्पट पथकर भरून ३० लाख रुपये सरकारच्या तिजोरीत जमा केले आहेत.

पथकरनाक्यांवरून जाताना लांबच लांब लागलेल्या वाहनांच्या रांगा, सुट्टे पैसे देताना होणारे वाद इत्यादी कारणांवरून वाहनांचा वेग कमी होत होता. परिणामी बराच वेळ खर्ची करावा लागत असल्याने यावर तोडगा म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील पथकरनाक्यांवर वाहनांसाठी फास्टॅग यंत्रणा अमलात आणण्याचा निर्णय घेतला. वाहनांवर फास्टॅग बसविल्यानंतर पथकरनाक्यावर येताच तेथील सेन्सरद्वारे वाहनांवरील टॅग वाचला जाईल आणि चालकाच्या खात्यातून पथकराचे पैसे वजा होतील, अशी यंत्रणा असून १५ डिसेंबर २०१९ पासून त्याची अंमलबजावणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या राज्यातील ३७ पथकरनाक्यांवर करण्यात आली आहे.

अद्यापही बऱ्याच वाहनचालकांनी वाहनांवर फास्टॅग बसविलेले नाहीत. तर काही वाहनचालकांनी फास्टॅगचे रिचार्जही केलेले नसल्याचे समोर आले आहे. अशा वाहनचालकांना या मार्गिकेचा वापर करून झटपट प्रवास करायचा असेल, तर दुप्पट पथकर भरावा लागेल असा नियम आहे.

वसुली.. : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या सातारा, पुणे, धुळे, सोलापूर, पिंपळगाव, नाशिकसह अन्य महामार्गावरील १८ पथकरनाक्यांवरून जाताना ९ हजार १६ चालकांनी दुप्पट पथकर भरल्याने १६ लाख ४४ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. तर नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद ते ऐडशी, नागपूर ते हैदराबाद, नागपूर ते जबलपूर, नागपूर ते रायपूर, नागपूर ते अमरावती यांसह अन्य महामार्गावरील १९ पथकरनाक्यावरून जाताना ९ हजार २०० चालकांनी एकूण १४ लाख रुपये दुप्पट पथकर भरल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.