बंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. के. पी. विश्वनाथ यांची राहुरी (जि. अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सोमवारी विश्वनाथ यांची पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती केली. विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांचा कार्यकाल ३० डिसेंबर रोजी संपत आहे. विश्वनाथ यांनी बंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठातूनच एम एस्सी (कृषी) व पीएच.डीपर्यंतचे शिक्षण घेतले. तामिळनाडूच्या अन्नमलाई विद्यापीठातून बौद्धिक मालमत्ता हक्क या विषयात देखील त्यांनी पीएच.डी मिळवली आहे.
विश्वनाथ यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति स्थापन केली होती. समितीने समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची मुलाखात घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. विश्वनाथ यांची कुलगुरूपदावर नियुक्ती केली.