पुनर्रचना करण्यात आलेले साहित्य व संस्कृती मंडळ म्हणजे ‘राजकीय तडजोड’ असल्याची टीका करत या मंडळाचे सदस्यत्व स्वीकारण्यास ज्येष्ठ साहित्यिक, ‘गोटय़ा’, ‘राजा शिवछत्रपती’ या गाजलेल्या मालिकांचे लेखक आणि ‘नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा’च्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी नकार दिला आहे.
साहित्य व संस्कृती मंडळाचा एकूण चेहरा पाहता महाराष्ट्रात सांस्कृतिक हुरूप वाढविणे आणि सांस्कृतिक परिवर्तन घडविण्याची उमेद बाळगणे हे व्यर्थ असल्याचे परखड मतही डॉ. देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले. साहित्य व संस्कृती मंडळाची पुनर्रचना आणि नव्याने केलेल्या बांधणीमागे कोणतीही ठोस वैचारिकता आणि गांभीर्यताही दिसून येत नाही. मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सर्व बंधू व भगिनी मला प्रिय असले तरी या सगळ्यांची अशी ‘मोट’ बांधायची वेळ का यावी, असा सवाल करून ही केवळ ‘राजकीय तडजोड’ आहे आणि अशा मंडळावर सदस्य म्हणून राहण्यात आपल्याला स्वारस्य नाही, असेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.
साहित्य आणि संस्कृतीचे विविध आयाम असून याच्याशी संबंधित असलेल्या विविध क्षेत्रात अनेक दिग्गज मंडळींनी काम केले आहे. विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, दशावतार, कीर्तन, तमाशा, चित्रपट आणि अन्य विविध कलांशी संबंधित दिग्गज मंडळींना या मंडळावर घ्यायला हवे होते. महाराष्ट्राचे खणखणीत सांस्कृतिक नेतृत्व यातून निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे काहीही चिह्न् दिसून येत नसल्याचे सांगून डॉ. देशपांडे म्हणाले, मंडळात गंभीरपणे एखाद्या विषयावर चर्चा होईल, असे वाटत नाही. मंडळांची गंभीरपणे बांधणी करण्यात आली असती आणि सदस्य म्हणून मला घेतलेही नसते तरी मनापासून आनंद झाला असता. डॉ. देशपांडे यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे किंवा अध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली त्या बाबा भांड यांच्याकडूनही मंडळाच्या सदस्यपदी माझी नियुक्ती करण्यात येत आहे, असे सांगण्यात आलेले नाही. निवड झाल्याचे मला वृत्तपत्रातूनच कळले. याची मला खंत वाटते.
    – डॉ. शिरीष देशपांडे,     ज्येष्ठ साहित्यिक.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr shirish gopal deshpande refused to become member of maharashtra state board for literature culture
First published on: 09-08-2015 at 02:10 IST