रामकृष्ण नायक यांचा सल्ला; मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटय़ोत्सवास सुरुवात
कलाकारांनी सत्कार व श्रेय घेण्याच्या मागे न लागता आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहावे, असा सल्ला ज्येष्ठ रंगकर्मी आणि ‘धि गोवा हिंदूू असोसिएशन’चे रामकृष्ण नायक यांनी दिला.
मुंबई मराठी साहित्य संघ आणि धि गोवा हिंदूू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गिरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दामू केंकरे स्मृती नाटय़ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नायक बोलत होते. नाटय़ महोत्सवाचे यंदा दहावे वर्ष आहे. ज्येष्ठ नाटककार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जे. जे. महाविद्यालयात शिकत असताना प्राध्यापक असलेल्या दामू केंकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली जडणघडण झाल्याचे गवाणकर यांनी सांगून दामू केंकरे यांच्या काही आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेबाबतही माहिती दिली. तर विजय केंकरे म्हणाले, माझे वडील दामू केंकरे यांच्या नावाने आयोजित केल्या जाणाऱ्या नाटय़ोत्सवात मी दिग्दर्शित केलेल्या ‘गडय़ा आपुला गाव बरा’ हे नाटक सादर होत असून माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे.
प्रा. उषा तांबे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन गणेश आचवल यांनी केले, तर साहित्य संघाच्या नाटय़शाखेचे कार्यवाह सुभाष भागवत यांनी उपस्थितांचे आभार मानले. मुंबई मराठी साहित्य संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ. बाळ भालेराव यांच्या हस्ते नायक व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.
या महोत्सवात मराठी आणि हिंदूी या दोन्ही भाषांत नाटय़प्रयोग सादर होणार आहेत. आचार्य अत्रे लिखित ‘प्रीतिसंगम’ या नाटकाने १० मे रोजी नाटय़ोत्सवाची सांगता होणार आहे.