ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे गुरुवारी दुपारी भरलेला पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार उशीरापर्यंत सुरू राहिल्याने सायंकाळी ४.३० वाजताचा ‘ठष्ठ’ नाटकाचा प्रयोग पाहाण्यासाठी जमलेल्या रसिकांनी या ठिकाणी गोंधळ घातला. प्रयोगाची वेळ उलटल्यानंतरही पालकमंत्री आपल्या दरबारात मग्न होते. सभागृहाबाहेर मोठय़ा संख्येने जमलेल्या रसिकांनी सुरुवातीला आर्जव करून पाहिले. त्यानंतरही नाटकाचा प्रयोग काही सुरू झाला नाही. पाच वाजले तरी प्रयोग सुरू होत नसल्याने संतप्त प्रेक्षकांनी पालकमंत्र्यांचे नाव घेऊन जाहीरपणे त्यांचा उद्धार सरू केला. त्यानंतर सभागृहात रंगलेले नाईकांचे ‘दरबार नाटय़’ तातडीने आवरते घेण्यात आले.
अखेर ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल पाऊण तासा उशीराने सायंकाळी सव्वापाच वाजता ‘ठष्ठ’चा प्रयोग सुरू झाला. या गोंधळानंतर उपरती झालेल्या पालकमंत्र्यांनी यापुढे नाटकाचा प्रयोग असताना जनता दरबार घेणार नाही, असे जाहीर केले.
पालकमंत्री नाईक हे महिन्यातून दोन वेळा ठाणे, नवी मुंबईतील नाटय़गृहांमध्ये जनता दरबार घेतात. गुरुवारीही नाटकाच्या प्रयोगाआधी किमान अध्र्यातास आधी पालकमंत्री सभागृह रिकामे करतील, अशी व्यवस्थापनाची अपेक्षा होती. मात्र, दरबारात प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागताच पालकमंत्र्यांना वेळेचे भान राहीले नाही. नाटकाची वेळ उलटून गेली तरी नाईकांचा दरबार संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. बाहेर जमलेल्या रसिकांचा संयम मात्र सुटू लागला होता. त्याचवेळी जनता दरबार उशीरा संपणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
तसेच नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आल्याची चर्चाही अचानक सुरू झाली. बराच वेळ सभागृहाबाहेर ताटकळत असलेल्या प्रेक्षक यामुळे संतापले आणि पालकमंत्र्यांच्या नावाने शिमगा करू लागले. काही प्रेक्षकांची उपस्थित अधिकारी आणि पोलिसांशी बाचाबाची झाली. हे कळताच अखेर पालकमंत्र्यांनी दरबार आवरता घेत येथील दुसऱ्या सभागृहात दरबाराचे कामकाज सुरू केले.