चालकांना वाहतुकीचे नियमच अमान्य असल्याचे चित्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महामार्गाच्या हद्दीत दारूविक्री बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पळवाटा काढण्याचा प्रयत्न विविध राज्यांमधील सरकारे करत असली, तरी महाराष्ट्रातील गेल्या दोन वर्षांतील मद्यपी वाहन चालकांवरील कारवाईच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास धक्कादायक चित्र दिसते. २०१५ या वर्षांत राज्यातील शहर, ग्रामीण आणि महामार्ग अशा रस्त्यांवर केलेल्या कारवाईत ५३,०४९ जण मद्यधुंद अवस्थेत गाडय़ा हाकताना पकडले गेले होते. २०१६ या वर्षांत हा आकडा १.०८ लाखांवर पोहोचला. विशेष म्हणजे मद्यपान करून गाडी चालवल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मात्र ५८ एवढी किरकोळ असल्याची माहिती महामार्ग पोलिसांमधील सूत्रांनी दिली.

महामार्गापासून ५०० मीटपर्यंतच्या हद्दीत दारूविक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. या निर्णयानंतर विविध राज्यांनी आपल्या हद्दीतील महामार्गाचा दर्जा कमी करण्याची पळवाट काढण्यास सुरुवात केली. या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यभरात किती मद्यपी चालकांवर कारवाई झाली, याची शहानिशा केली असता या कारवाईत दुपटीने वाढ झाल्याचे लक्षात आले. महामार्ग पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१५ या वर्षांत राज्यभरातील विविध रस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत ५३,०४९ जणांना पकडण्यात आले. या मद्यपी चालकांकडून ७.५६ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. २०१६ या वर्षांत कारवाई केलेल्या मद्यपी चालकांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली. २०१६मध्ये १,०८,५६४ जणांकडून ११.९८ कोटी रुपयांचा दंड वसूल झाला. म्हणजेच दोन वर्षांमध्ये एकूण १९ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड या मद्यपी चालकांकडून वसूल करण्यात आला.

राज्यातील एकूण रस्ते अपघातांपैकी दारू पिऊन वाहन चालवल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण ०.५६ टक्के एवढे अत्यल्प आहे. त्यातही अशा अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या ०.४५ टक्के आहे. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने झालेल्या अपघातांमध्ये फक्त ५८ जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारी दर्शवते. महामार्ग पोलिसांमधील एका अधिकाऱ्याने ही मृत्यूबाबतची आकडेवारी काहीशी फसवी असल्याचे सांगितले.

  • मद्यधुंद अवस्थेतील चालकांवरील कारवाईची तीव्रता दहा वर्षांपूर्वी वाढवण्यात आली होती. अशी कारवाई केल्यास मद्यपी चालकांची संख्या कमी होऊन अपघातही घटतील, असा विचार केला गेला होता.
  • प्रत्यक्षात वर्षांगणिक मद्यपी चालकांची संख्या वाढत गेलेली आढळते. गेल्या काही वर्षांमध्ये महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या हाती ब्रेथ अ‍ॅनॅलायझरसारखे यंत्र आल्यानंतर मद्यपी चालकांवर कारवाई करणे अधिक सोपे झाले आहे. तरीही नियमांना बगल देत मद्यधुंद अवस्थेत गाडय़ा चालवून आपला आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drink and drive traffic rules and guidelines
First published on: 13-04-2017 at 00:12 IST