मुंबई : राज्यातील औषध उत्पादक औषधांची निर्मिती करताना औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, अन्न आणि औषध प्रशासनाने जानेवारी ते मार्चदरम्यान केलेल्या ६५५ उत्पादकांच्या तपासणीतून ही बाब उजेडात आली आहे. यापैकी ९५ उत्पादकांनी औषधांचे उत्पादन करताना कायद्याचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्याच वेळी यापैकी १६ उत्पादकांवर गंभीर दोषारोप असल्याने त्यांना कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार औषधांचे उत्पादन करण्यासाठी महत्त्वपूर्ण नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे उत्पादकांना बंधनकारक आहे. उत्पादक या नियमांचे पालन करीत आहेत की नाही याची तपासण्याची जबाबदारी एफडीएवर आहे. त्यानुसार एफडीएमार्फत उत्पादक कंपन्यांची तपासणी करण्यात येते. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांविरोधात कारवाई केली जाते. याचाच भाग म्हणून एफडीएने जानेवारी ते मार्च या काळात राज्यातील उत्पादकांची तपासणी केली होती. यात कोकण विभागातील ३६६, बृहन्मुंबई विभागातील ५२, पुणे विभागातील १०४, नाशिक विभाग ४३, औरंगाबाद विभाग ४७, नागपूर विभाग २२ आणि अमरावती विभागातील २१ उत्पादकांचा समावेश आहे.
या ६५५ उत्पादकांपैकी ९५ उत्पादकांकडून कायद्याचे पालन केले जात नसल्याने तपासणीत समोर आले. या सर्वाना कारणे दाखवा नोटीस बाजाविण्यात आली आहे. यातील १६ उत्पादक कंपन्यांमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्याने त्यांना कामबंदचे आदेश देण्यात आल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे. तसेच १७ प्रकरणात सुधारणेस वाव असल्याने त्यांना आवश्यक त्या सुधारणा करत यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारणेदाखवा नोटिशीला कंपन्यांकडून काय उत्तर येते यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. पुढील कार्यवाहीत दोषी आढळणाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यासह कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.