अल्प्राझोलम, कोरेक्सचा साठा हस्तगत

एकीकडे शहरातील तरुणवर्गात अमली पदार्थाचे व्यसन वाढत चालल्याचे समोर येत असताना आता ठरावीक औषधांचाही नशेसाठी वापर होऊ लागल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाने अलीकडेच वाडीबंदर परिसरात छापा घालून अल्प्राझोलमच्या सुमारे ८० हजार गोळ्या हस्तगत केल्या. या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांना पथकाने अटक केली आहे. गोळ्या विकत घेणाऱ्यांमध्ये शाळा-महाविद्यालयातील युवकांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती दोघींच्या चौकशीतून समोर आली आहे.

अल्प्राझोलम गोळ्यांचा वापर मानसिक विकारांवरील उपचारांमध्ये होतो. या गोळ्यांमुळे झोप येण्यास मदत होते. मात्र प्रमाणापेक्षा जास्त गोळ्यांचे एकाच वेळेस सेवन केल्यास जिवावर बेतू शकते. त्यामुळे औषधांच्या दुकानात डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय या गोळ्या विकल्या जात नाहीत. मात्र या गोळ्यांचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. वाडीबंदर परिसरात या गोळ्यांची खुलेआम विक्री होते, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान कक्षाला मिळाली होती. चिंचबंदर परिसरात राहणारी नसरीन शेख (२५) ही तरुणी औषधी गोळ्या विकत असल्याचे पथकाच्या स्पष्ट झाले. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून नसरीनला ताब्यात घेतले. तिच्या घरी छापा घालून शोधाशोध केली असता अल्को, एक्सल-पॅम, नायट्राझेपाम या नावे विक्रीस उपलब्ध असलेल्या अल्प्राझोलमची तब्बल आठ हजार पाकिटे सापडली. याशिवाय कोरेक्स कफ सीरपच्या ६५ बाटल्या आढळल्या. नसरीनच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे रेश्मा खान या महिलेलाही अटक करण्यात आली. तिच्या घरातून कफ सीरपच्या दीडशे बाटल्या जप्त करण्यात आल्या. अल्प्राझोलम गोळ्यांचे एक पाकीट (दहा गोळ्यांचे) २७ रुपयांना औषध दुकानातून विकले जाते. नसरीन, रेश्मा हे पाकीट १०० ते १५० रुपयांना विकत. कफ सीरपची विक्रीही चढय़ा भावानेच केली जात असे. कोकेन, एमडी, चरस विकत घेणे शक्य नसलेला वर्ग औषधांद्वारे नशा करतो, असे निरीक्षण अमली पदार्थ विरोधी पथकाकडून नोंदवण्यात आले. यात शाळा, महाविद्यालयातील तरुण आघाडीवर आहेत. अमली पदार्थ असलेल्या मॅण्ड्रेक्सच्या गोळ्यांना ‘बटण’ असे संबोधले जाते. सध्या अल्प्राझोलमच्या गोळ्यांचाही  ‘बटण’ म्हणूनच उल्लेख होतो.

वितरक, विक्रेत्यांचीही चौकशी

औषधांच्या दुकानांवर डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय अल्प्राझोलम, कोरेक्स कफ सीरप मिळत नाही. असे असताना या दोघींकडे नशिल्या औषधांच्या इतका साठा कसा, हे शोधण्यासाठी पथकाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. औषधांचे उत्पादक, वितरक, साठेबाज आणि औषध विक्रेते या साखळीतील प्रत्येकाकडे चौकशी होणार असल्याचे समजते.