उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या नावे नाशिकच्या कार्यालयातून तयार करण्यात आलेली बोगस रेशनकार्डे शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी मंगळवारी विधानसभेत फडकावली. बोगस रेशनकार्डे तयार करून धान्य उचलले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुष्काळावरील चर्चेत भाग घेताना देसाई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव त्यांच्या कुटुंबियांच्या नावे तयार झालेली केशरी रंगाची तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या नावे तयार करण्यात आलेली पांढऱ्या रंगाची शिधापत्रिका तयार करण्यात आल्याची माहिती दिली. नाशिकच्या शिधावाटप कार्यालयात या बोगस शिधापत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. बाहेरच्या राज्यातून येऊन कोणी काहीही करते, पण सरकारचे त्याकडे लक्ष नसल्याचा आरोपही देसाई यांनी
केला. सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण त्याचा लाभ झालेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.