लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील परिचारिका व डॉक्टरांना निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आले असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये करण्यात येत असलेली परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया आचारसंहितेमध्ये अडकली आहे. परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र आचारसंहितेमुळे त्यांना नियुक्ती देता येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचारी यांची भरती करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतून ६५२ परिचारिकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या परिचारिकांची पोलिस पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी पूर्ण झाली होती. त्यामुळे त्यांना लवकरच नियुक्ती पत्र देण्यात येणार होते. मात्र आचारसंहिता लागू करण्यात आल्याने ही नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे. परिचारिकांप्रमाणेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे. अवघ्या १२ जणांना नियुक्ती पत्र दिल्याने ते कामावर रूजू झाले आहेत, मात्र आचारसंहितेमुळे उर्वरित निवड झालेल्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलेली नाही, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आणखी वाचा-दीडशे वर्षांच्या जी. टी. रुग्णालयात आता वैद्यकीय महाविद्यालय!

कंत्राटी भरती करण्यासही परवानगी नाही

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली जात असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरण्याचा विचार महानगरपालिकेकडून करण्यात आला होता. मात्र आचारसंहितेमुळे कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी भरती करण्यासही परवानगी नाकारण्यात येत असल्याचेही महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.