एकीकडे तौते चक्रीवादळाचे संकट मुंबईसह अनेक लगतच्या जिल्ह्यांमध्ये घोंघावत असताना व वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान सुरू असताना, दुसरीकडे भर पावसात प्राणवायू प्रकल्पाच्या उद्घाटनाचा मोह राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आवरला नसल्याचं समोर आलं आहे.

प्राणवायू प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी वादळतही एकनाथ शिंदे यांच्यासही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. एकीकडे राज्यात लॉकडाउनचे कडक निर्बंध व मुंबईत तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असतानाही, मंत्र्यासह नेते मंडळी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनच गर्दी करण्यात आल्याने, आता यावर टीका सुरू झाली आहे.

भाईंदर पश्विम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात प्राणवायूची कमतरता दूर करण्याकरिता पालिका प्रशासनाकडून प्राणवायू प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे अधिक १२० प्राणवायू खाटांची सोय होणार असून यासाठी पालिका प्रशासनाने १ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मिरा-भाईंदर शहरातील वाढत्या करोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता हे आवश्यक होते. आज (१७ मे) या प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्याचे ठरवण्यात आले होते. तर, गेल्या दोन दिवसांपासून तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतत करण्यात येत असलेल्या सतर्कतेच्या आवाहनामुळे हा उद्घाटन कार्यक्रम होईल की नाही किंवा कशाप्रकारे होतो, याची सर्वांना उत्सुकता होती.

मात्र या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा मोह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आवरता आला नसल्याचे आज दिसून आले. त्यामुळे भर वादळात व मुसळधार पावसाच्या हजेरीत महापौर ज्योस्त्ना हसनाळे, खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, पालिका आयुक्त दिलीप ढोले आणि पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी, तसेच शिवसेना कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची वेळ आली.

एकीकडे राज्यातील जनतेला कडक निर्बंधांचे पालन करण्यास सांगितले जात असताना व गर्दी टाळण्याचे वेळोवेळी आवाहन केले जात असताना, दुसरीकडे अशाप्रकारच्या परिस्थितीतही उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन, त्यासाठी झालेली गर्दी पाहून, करोनाबाधितांच्या नातेवाईकांसह, स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.