मुंबई : राज्यात गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक एक लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक ही अवघ्या नऊ महिन्यांत आली आहे. गुंतवणुकीच्या क्षेत्रात राज्याने २०१६चा स्वतःचाच विक्रम मोडला असून, जनाधाराचा सन्मान करताना येत्या पाच वर्षांत घरगुती ग्राहकांच्या वीजदरात २४ टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. वीजकपातीबरोबरच ‘स्मार्ट’ मीटर बसविणाऱ्या ग्राहकांना दिवसा वापरलेल्या विजेवर १० टक्के सवलत देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनातील चर्चेच्या उत्तरात फडणवीस यांनी राज्यापुढील प्रश्न व ते सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्यात गेल्या काही वर्षांपासून घरगुती विजेच्या दरात दरवर्षी साधारणतः नऊ टक्क्यांनी वाढ होत आहे. मात्र आता दरात वाढ होऊ न देता येत्या पाच वर्षांत त्यामध्ये कपात केली जाणार आहे. त्यानुसार १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी २४ टक्के, तर १०० ते ३०० युनिट वापरासाठीचे दर १७ टक्क्यांनी कमी केले जाणार आहेत. राज्यातील ९५ टक्के घरगुती ग्राहकांना वीजदरकपातीचा थेट लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवले, तर दिवसा वापरलेल्या विजेवर १० टक्के सवलत मिळेल. प्री-पेड मीटर ऐच्छिक स्वरूपाचे ठेवण्यात आले असून ग्राहकांना पोस्टपेड मीटरचा पर्याय उपलब्ध असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
अन्य घोषणा
– शेतकऱ्यांचे ७५ हजार कोटींचे थकीत वीज बिल हळूहळू फेडण्याची योजना.
– प्रधानमंत्री आवास योजनेतील २० लाख घरांना मोफत सौरऊर्जा
– ‘सूर्यघर’च्या माध्यमातून ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज
‘महावितरण शेअर बाजारात’
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचिबद्ध करण्याचा शासनाचा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. असे झाल्यास महावितरण शेअर मार्केटमध्ये सूचिबद्ध होणारी देशातील पहिली वीज वितरण कंपनी ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरेंना टोला
मागील सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांची जबाबदारी आम्हा तिघांची आहे. या योजनांना स्थगिती देण्याबाबत खोटा प्रचार केला जात आहे. योजनांना स्थगिती द्यायला आपण काही उद्धव ठाकरे नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.