एल्फिन्स्टन स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा २२ वरुन २३ वर पोहचला आहे. सत्येंद्र कनोजिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सत्येंद्र कनौजिया यांच्यावर केईएम रूग्णालयात उपचार सुरु होते आणि त्यांचे वय ४० वर्षे होते. शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीत कनोजिया जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र थोड्याच वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचमुळे या घटनेतील मृतांचा आकडा आता २२ वरून २३ वर पोहचला आहे.

शुक्रवारी मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकात जी चेंगराचेंगरी झाली ती तेथील अरूंद पुलामुळे झाली. अत्यंत दुर्दैवी अशीही घटना होती. मुंबईकरांसाठी कालचा दिवस ‘काळा शुक्रवार’ ठरला. या घटनेतून कसेबसे सावरत आणि शुक्रवारी घडलेली वेदना मनात ठेवून मुंबईकर कामाला लागला. अशातच या घटनेतील जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील ट्विट केले आहे.

शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एल्फिन्स्टन स्थानकात ही दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली. तर गंभीर जखमींना १ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. आता या घटनेतील जे ३३ लोक जखमी झाले होते त्यापैकी सत्येंद्र कनोजिया यांचा मृत्यू झाला.