प्रतीक्षानगरमधील रहिवाशांचीही मुजोरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये पदपथावर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणाने येथील म्हाडा संक्रमण शिबिर वसाहतीमधील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

प्रतीक्षानगरमधील सुंदरनगर विभागात म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या सात ते आठ इमारती आहेत. वडाळा, प्रभादेवी, करी रोड येथील साधारण हजार एक कुटुंबे या इमारतींत राहतात. पण सध्या रहिवाशांना अनधिकृत दुकानदारांच्या मुजोरपणाला सामोरे जावे लागत आहे. इमारतीबाहेरील जागेवर अतिक्रमण केल्यानंतर आता दुकानदारांनी इमारतीच्या संरक्षण िभतीच्या आत आपली दुकाने मांडत आहेत. यात पोळी-भाजी केंद्र, कपडय़ाचे व्यावसायिक, मोबाइल दुरुस्ती करणाऱ्या दुकानांची संख्या जास्त आहे. या सगळ्या प्रकारामुळे तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

पोळी-भाजी विक्री करणारे तिथेच अन्न शिजवत असल्याने एलपीजी गॅसचे सिलिंडर त्या ठिकाणी पडून असतात. यामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दुकानदारांबरोबरच इमारतीत राहणारे रहिवासीही उद्दामपणा करतात. अनेकांनी आपल्या गाडय़ांसाठी इमारतीच्या आवारात बांबू आणि प्लास्टिकच्या ताडपत्री लावून शेड तयार केल्या आहेत. या ताडपत्रींवर पाणी साचून राहते. साचलेल्या पाण्यात डेंग्यूसदृश डासांची पदास होत असते. याबाबत पालिका कर्मचाऱ्यांकडून वारंवार समज देऊनही रहिवासी बधत नाहीत.

कारवाई करूनही पुन्हा या शेड जैसे थे उभ्या राहतात, अशी तक्रार येथील एका रहिवाशाने ‘लोकसत्ता-मुंबई’शी बोलताना केली.

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Encroachment of footpaths by shopkeepers in sion pratiksha nagar
First published on: 14-10-2016 at 01:52 IST