डोंगरीतील केसरबाई या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील बचावकार्य बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरू होते. बचावकार्यात स्थानिकांचीही मोलाची मदत झाली. बुधवारी पहाटे हलिमा रशीद इद्रिस या महिलेला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. ढिगाऱ्यात मोठय़ा लोखंडी खांबाखाली हलिमा सापडली होती. पहाटे हलिमाचा आवाज ऐकताच रात्रभर चाललेले मदतकार्य यशस्वी झाल्याचा आनंद स्थानिकांच्या चेहऱ्यावर उमटला. मात्र या दुर्घटनेत हलिमाच्या मुलांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने तो अल्पजीवी ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी दिवसभर ढिगारे उपसण्याचे काम सुरू होते. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या परिसरात मंगळवारी सकाळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा अडथळा बचाव पथकाला जाणवत होता. त्यामुळे बुधवारी स्थानिकांनी प्रशासनातील अधिकारी आणि मदतकार्यात गुंतलेले स्थानिक नागरिक यांच्याव्यतिरिक्त कोणासही इमारतीजवळ फिरकू दिले नाही. परिणामी मदतकार्य विनाअडथळा सुरू होते. मंगळवारी इमारत पडल्याचे समजताच शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. अनेक जण बुधवारी संध्याकाळी ढिगारा उपसण्याच्या कामाला लागले. त्यांची मोलाची मदत झाली, असे अग्निशमन दलाचे अधिकारी सांगत होते. मदतकार्य करताना स्थानिक रहिवासी समीर यांच्या बोटाला दुखापत झाली. मात्र तरीही त्यांच्या कामात खंड पडला नव्हता. बोटाला मलमपट्टी करून ते मदतकार्य करत होते.

केसरबाई इमारतीकडे जाणाऱ्या गल्ल्या चिंचोळ्या असल्याने रात्री पुरेसा प्रकाश नव्हता. त्या वेळी मदतकार्य करण्यासाठी पुण्याहून आलेल्या एका गटाची मदत झाली. त्यांनी सोबत आणलेला दिव्यांचा संच कामी आला. त्यांनी केलेल्या दिव्यांच्या रोषणाईची यंत्रणांना मदतकार्य करताना मोलाची मदत झाली. त्यातून बचावकार्य रात्रभर सुरू ठेवणे यंत्रणांना शक्य झाले, अशी माहिती स्थानिक रहिवासी फैजलने दिली. बुधवारी पहाटे एका शिवणकाम कारागिराचाही मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: End of rescue in the evening after wednesday evening abn
First published on: 18-07-2019 at 01:48 IST