मराठीतील पहिले प्रवासवर्णन म्हणून प्रसिद्ध असलेल्या विष्णुपंत गोडसे लिखित ‘माझा प्रवास’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला आहे. प्रिया आडारकर आणि शांता गोखले यांनी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला असून ऑक्सफर्ड युनिव्‍‌र्हसिटी प्रेसच्या ‘ओयुपी नॉव्हेल्स’या मालिकेअंतर्गत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. भारतीय भाषांमधील उत्तम पुस्तके या मालिकेअंतर्गत इंग्रजी भाषेत अनुवादित होणार आहेत.
मराठी भाषेमध्ये गोडसे भटजी यांनी लिहिलेल्या ‘माझा प्रवास’या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोडसे भटजींनी १८५७ मध्ये उत्तर हिंदूुस्थानचा प्रवास पायी केला होता. या प्रवासादरम्यानचे आपले अनुभव त्यांनी लिहून काढले होते. १८५७ मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात पहिला उठाव झाला होता. त्याचे वर्णनही गोडसे भटजींनी या पुस्तकात केले आहे. मराठी भाषा, इतिहास आणि समाजशास्त्र या दृष्टीनेही या पुस्तकाला महत्त्व आहे.
भाषांतरकार, अनुवादक यांचा सहभाग असलेला ‘तर्जुमा महोत्सव’ नुकताच अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात ऑक्सफर्डतर्फे ‘ओयुपी नॉव्हेल्स’ या मालिकेची घोषणा करण्यात आली.
भारतीय भाषांमधील उत्तमोत्तम साहित्य जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी ते इंग्रजी भाषेत अनुवादित केले जाणार असल्याचे ऑक्सफर्ड युनिव्‍‌र्हसिटी प्रेस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रंजन कौल यांनी सांगितले. त्यामुळे भारतीय प्रादेशिक भाषांमधील लेखकांचाही जागतिक पातळीवर गौरव होणार असल्याचे ते म्हणाले.
‘ओयुपी नॉव्हेल्स’या मालिकेअंतर्गत जी पुस्तके इंग्रजीत अनुवादित होणार आहेत, त्याचे संपादन मिनी कृष्णन करणार आहेत. या मालिकेअंतर्गत मराठीतील लेखिका सानिया, तेलुगू लेखक पी. केशव रेड्डी, मल्लाळम लेखक जॉनी मिरांडा, तमिळ लेखक सी. एस. चैलप्पा, बंगाली लेखक नबेंदिता दास आदी लेखकांच्या पुस्तकाचे इंग्रजी अनुवाद येत्या वर्षभरात प्रकाशित होणार आहेत.
गोडसे भटजी यांच्या ‘माझा प्रवास’चा इंग्रजी अनुवाद यापूर्वी पत्रकार मृणाल पांडे व अलीकडेच सुखमणी रॉय यांनी केलेला आहे. पांडे यांनी हिंदी अनुवादाच्या, तर रॉय यांनी न. र. फाटक संपादित मराठी पुस्तकाच्या आधारे हे अनुवाद केले आहेत.