गेले काही दिवस सोन्याचे गडगडणारे दर आणि ‘गुरुपुष्यामृत’ योग हे समीकरण ग्राहकांसाठी अगदी जुळून आले व सोन्याच्या खरेदीला उत्साहाची नवी झळाली मिळाली. ‘गुरुपुष्यामृत’ योग दुपारनंतर असल्याने सायंकाळनंतर सोन्या-चांदीच्या पेढय़ांवर ग्राहकांची एकच गर्दी उसळली.मुंबई सुवर्णकार संघाचे अध्यक्ष सुधीर पेडणेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, ग्राहकांनी गुरुवारी मुख्यत: २३ कॅरटची वळी किंवा नाणे या स्वरूपात सोनेखरेदी केली. ही सोन्याची नाणी, वळी १ ते १० ग्रॅममध्ये उपलब्ध होती. तर २४ कॅरेटच्या सोन्याची खरेदी प्रामुख्याने भविष्यातील गुंतवणूक म्हणून केली गेली. सोन्याचे कमी झालेले दर येत्या काही महिन्यांत पुन्हा वाढले तर? त्यापेक्षा आत्ताच खरेदी करू या, असा विचार यामागे होता. लवकरच लग्नाचा मोसम सुरू होईल त्यामुळे काही जणांनी आजच्या मुहूर्तावर मंगळसूत्र, सोन्याच्या बांगडय़ा/पाटल्या आणि या प्रकारच्या दागिन्यांसाठी भाव कमी झालेले असल्याने गुरुवारच्या मुहूर्तावर काही पैसे भरून दागिन्यांची नोंदणी केली असल्याचेही पेडणेकर म्हणाले.‘पु. ना. गाडगीळ अॅण्ड सन्स’च्या दादर येथील दुकानाचे व्यवस्थापक वृजेंद्र वाघचौरे म्हणाले की, भाव वाढतील या भीतीने नव्हे तर सध्या उतरलेल्या दराचा फायदा करून घ्यावा, या विचाराने ग्राहकांनी सोने खरेदी केली. आठ दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. परंतु दरात फार मोठा फरक पडलेला नाही. पण गेल्या काही वर्षांत सोन्याच्या भावाने जी उंची गाठली होती, त्या तुलनेत सध्याचे दर कमी झाल्याचा आनंद सर्वसामान्य ग्राहकांमध्ये आहे.