आयआयटीसारख्या शिक्षण संस्थांसाठी घेतल्या जाणाऱ्या निवड परीक्षांमध्ये त्रुटी असून त्याचा अभ्यासक्रम व परीक्षापद्धतही बदलण्याची गरज असल्याचे मत आयआयटी मुंबईचे प्रा. मिलिंद सोहनी यांनी व्यक्त केले. दैनंदिन विषयांकडे दुर्लक्ष करत वैश्विक अभ्यासक्रमांवर भर दिल्याने राज्यातील शिक्षण प्रणालीवर फार मोठा परिणाम झाला असून घोकंपट्टी व खासगी क्लासेससचे पेव यामुळे फुटल्याची खंतही सोहनी यांनी बोलून दाखवली.
डॉ. मनमोहन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील विज्ञान तंत्रज्ञान संस्थांचे योगदान आणि आव्हाने या विषयावर झालेल्या आणखी एका परिसंवादात प्रा. सोहनी बोलत होते. या परीसंवादात भाभा अणु संशोधन केंद्राचे डॉ. व्ही. एन. जगताप, एएफसीआयआरचे संचालक डॉ. सी. डी. माई, आयसीएमआरच्या निवृत्त उपमहासंचालक डॉ. वसंता मुथ्थूस्वामी, आयसीटीचे डॉ. अनिरुद्ध पंडित, पुण्यातील एन. सी.एल.चे डॉ. विवेक रानडे हेही सहभागी झाले होते. देशभरातील विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांच्या कार्याविषयी चर्चा करण्यात आली. सध्या तंत्रज्ञान संस्थांचे केंद्रीकरण झाल्याने प्रादेशिक समस्यांना यात स्थान नसून त्यांचा शासन आणि उद्योगांशी सांगड घालणे कठीण झाले आहे. आज निधी देणारे व तो वापरणारे यांच्यात विज्ञानाची एक नोकरशाहीच तयार झाली आहे, अशा शब्दांत संस्थांच्या कारभाराविषयी रोख-ठोक भूमिका घेत सोहनी यांनी कुतूहल आणि उपयुक्त विज्ञान संशोधानातील समन्वयाची आवश्यकताही व्यक्त केली.
तसेच विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे सहसंचालक माधव ढेकणे यांचे भारताची अवकाश संशोधनातील गरुडझेप या विषयावर व्याख्यान झाले. तसेच मराठी विज्ञान परिषदेकडून शुक्रवारी पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मान्यवरांशी संवादाचा कार्यक्रमही झाला. यात डॉ. माधुरी शानबाग यांनी आपल्या विज्ञानविषयक लेखांतील अनुभवांवर संवाद साधला. तसेच डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘एक्स-प्रिमेंट’ या प्रथम पारितोषिक प्राप्त एकांकिकेचे सादरीकरणही करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Error in iit entrance exams milind sohoni
First published on: 17-01-2016 at 00:03 IST