scorecardresearch

दुहेरी हत्याकांडातील आरोपीची फाशी रद्द ;बनावट पुरावे तयार केल्याचे पोलिसांवर ताशेरे ओढत आरोपीची निर्दोष सुटका

जोडप्याची झोपेत असताना ॲसिड टाकून हत्या केल्याच्या आरोपाप्रकरणी पालघर येथील गुड्डू यादव याला झालेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली.

मुंबई : जोडप्याची झोपेत असताना ॲसिड टाकून हत्या केल्याच्या आरोपाप्रकरणी पालघर येथील गुड्डू यादव याला झालेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली. चुकीचा तपास आणि बनावट पुरावे सादर केल्याप्रकरणी पोलिसांवर ताशेरे ओढताना न्यायालयाने यादवला संशयाचा फायदा देऊन त्याची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली.
ही सुटका केली गेली नाही तर तो अन्याय ठरेल, असेही न्यायालयाने नमूद केले. तसेच पुणे येथील येरवडा कारागृहात बंदिस्त असलेल्या यादवची तातडीने सुटका करण्याचे आदेशही कारागृह प्रशासनाला दिले. फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी ती उच्च न्यायालयाकडून कायम केली जाणे अनिवार्य आहे. त्यानुसार या प्रकरणीही पोलिसांनी यादव याची फाशीची शिक्षा कायम करण्याच्या विनंतीसाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती, परंतु न्यायमूर्ती साधना जाधव आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने ती फेटाळून लावली. पोलिसांनी सादर केलेल्या सगळय़ा पुराव्यांचा विचार करता त्यातील त्रुटी, विसंगती आणि कमालीची अनियमितता यातून हेच स्पष्ट होते की सरकारी पक्ष या दुहेरी हत्याकांडाचा घटनाक्रम जोडण्यात आणि आरोपीनेच या हत्या केल्याचे सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
हा खटला संशयाच्या आधारे उभा राहिलेला आहे. आरोपीला दोषी ठरवण्यासाठी स्पष्ट, ठोस किंवा विश्वासार्ह पुरावे गरेजेचे आहेत. या प्रकरणात ही स्थिती नाही. त्यामुळे यादवला फाशीची शिक्षा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, उलट अशा परिस्थितीत आरोपीला संशयाचा फायदा द्यायलाच हवा, नाही तर ती न्यायाची फसवणूक होईल, असे न्यायालयाने म्हटले.
कनिष्ठ न्यायालयावरही ताशेरे
पालघर येथील सत्र न्यायालयाने यादवला या दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवले होते. तसेच हे प्रकरण अनाकलनीय आहे आणि कोणत्याही प्रकारची सहानुभूती किंवा दयेला पात्र नसलेला हा असा गुन्हा आहे, असे निरीक्षण नोंदवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. न्यायमूर्ती जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मात्र सत्र न्यायालयाच्या या म्हणण्याशी असहमती दर्शवली. तसेच केवळ गुन्हा गंभीर आणि क्रूर आहे म्हणून आरोपीवर हत्येचा आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही कायदेशीर पुराव्याशिवाय कारवाई करणे योग्य नसल्याचे म्हटले. तसेच सत्र न्यायालयाने दिलेला निकाल सादर पुराव्यांशी सुसंगत राहून दिलेला नाही, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.
प्रकरण काय?
पोलिसांच्या आरोपानुसार, नोव्हेंबर २०१५ मध्ये यादवने त्याचा सहकारी राजकुमार रविदासचा मोबाइल चोरल्याचा त्याच्यावर आरोप होता. रविदासने मालकाकडे याबाबत तक्रार केली आणि मालकाने यादवला फटकारून रविदासचा फोन परत करण्यास सांगितले. यामुळे संतापलेल्या यादवने रविदासचा सूड घेण्याचे ठरवले. त्यानुसार, ६ नोव्हेंबर २०१५ रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास यादव बोईसर येथील कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी राहण्यासाठी उपलब्ध केलेल्या इमारतीत गेला. तेथे रविदास पत्नीसोबत राहत होता. यादव १० लिटर ॲसिडची बाटली घेऊन तेथे गेला होता. त्याने झोपेत असलेल्या रविदास आणि त्याच्या पत्नीवर ॲसिड ओतले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Execution accused double murder case canceled accused acquitted fabricating fake evidence amy

ताज्या बातम्या