|| समीर कर्णुक

पालिकेकडून २० हजार मिळत असतानाही कंत्राटदारांकडून ८ हजार रुपयांची बोळवण

मुंबई : मुंबई महापालिकेच्या ताब्यात असलेल्या अनेक स्मशानभूमींमध्ये सध्या साफसफाईसाठी कंत्राटी पद्धतीवर ठेवण्यात आलेल्या कामगारांची कं त्राटदारांकडून प्रचंड पिळवणूक सुरू आहे. या कामगारांना पालिका २० ते २२ हजार रुपये महिना मानधन देते. मात्र कंत्राटदार या कर्मचाऱ्यांना अवघे आठ हजार रुपये देऊन, बाकीची रक्कम गडप करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

मुंबईत सध्या १७८ स्मशानभूमी असून यातील ११६ स्मशानभूमी या खासगी आहेत, तर ६२ स्मशानभूमी पालिकेच्या ताब्यात आहेत. त्यांची देखभाल महापालिकेकडून करण्यात येते. साफसफाईसाठी पालिकेने प्रत्येक स्मशानभूमीत ३ ते ४ कंत्राटी कामगार ठेवले आहेत. खासगी कंत्राटदारांमार्फत या कर्मचाऱ्यांची भरती के ली जाते. पालिकेकडून या कर्मचाऱ्यांना २० ते २२ हजार रुपये मानधन देण्यात येते. मात्र दिवसभर स्मशानभूमीत राबणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांच्या हातात कंत्राटदार केवळ ८ ते ९ हजार रुपये टेकवत आहेत. पालिकेकडून या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाते. मात्र कंत्राटदाराने या कर्मचाऱ्यांचे बँक पासबुक, सही केलेले चेकबुक आणि एटीएम कार्ड स्वत:जवळ ठेवले आहेत. पालिकेकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर ही रक्कम काढून घेतली जाते. त्यानंतर कंत्राटदार कर्मचाऱ्यांच्या हातावर केवळ ८ ते ९ हजार रुपये ठेवून बाकीची रक्कम गडप करत असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत. याबाबत पालिके च्या स्मशानभूमी विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रश्न कं त्राटदार आणि कर्मचाऱ्यांमधील आहे. पालिकेशी त्यांचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.

१५ हजार पगाराची अपेक्षा

आम्ही करोनाच्या काळात इतर आरोग्य कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे न थकता, न घाबरता अहोरात्र या ठिकाणी काम केले. मात्र इतर कर्मचाऱ्यांना शासनाने करोनायोद्धे म्हणून वेगळा भत्ता दिला आहे. आम्हाला अशा प्रकारचा पालिकेकडून वेगळा भत्ता देण्यात आलेला नाही. पालिकेने आम्हाला तो भत्ता द्यावा. तसेच आम्हाला कंत्राटदाराने किमान १५ हजार रुपये पगार तरी महिन्याकाठी द्यावा, अशी मागणी सफाई कामगारांनी केली आहे.