घरकाम करणाऱ्या १२ वर्षीय मुलीला पुण्याला नेऊन तिला गरम सुरीचे चटके देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सिने अभिनेत्री हुमा खान हिला ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी शुक्रवारी तीन वर्षांची शिक्षा सुनावली असून, पीडित मुलीला दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या समुद्दीन शेख ऊर्फ समीर याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
मीरारोड भागात सिने अभिनेत्री हुमा खान राहत असताना याच भागातील एक महिला तिच्याकडे घरकाम करायची. या महिलेच्या १२ वर्षीय मुलीलाही तिने घरकाम करण्यासाठी ठेवून घेतले होते. जून २००७ मध्ये हुमा खान त्या मुलीला घेऊन पुण्याला राहण्यास निघून गेली. या संदर्भात तिने मुलीच्या आईला काहीच सांगितले नव्हते. आठवडय़ानंतर तिने फोनवरून याबाबत तिच्या आईला माहिती दिली. पुण्याला राहत असताना हुमा खानने त्या मुलीला गरम सुरीने चटके दिले. त्याचे सुमारे ६६ व्रण तिच्या अंगावर आहेत. तसेच उकळत्या पाण्यात मसाला टाकून तिच्या तोंडात ओतला. २४ फेब्रुवारी २००८ मध्ये ती मुलगी तिच्या तावडीतून सुटून मीरारोड येथील आपल्या घरी आली. या प्रकाराबाबत तिने माहिती दिल्यानंतर तिच्या आईने मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हुमाविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती. तसेच हुमाच्या सांगण्यावरून समुउद्दीन शेख याने तिच्यावर बलात्कार केल्याचेही तक्रारीत तिच्या आईने म्हटले होते. त्यानुसार, पोलिसांनी त्याला अटक केली होती.
या प्रकरणाची सुनावणी ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांच्यासमोर झाली. सरकारी वकील हेमलता देशमुख यांनी न्यायालयात सादर केलेले सर्व साक्षी पुरावे ग्राह्य मानून न्या. वाघवसे यांनी हुमा खानला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच पीडित मुलीला दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. दरम्यान, हुमा खानने तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगत जामीनासाठी अर्ज केला असता, न्यायालयाने ५० हजारांच्या रोख जामीनावर तिची सुटका केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.