शेतकऱ्यांचे सध्या सुरू असलेले आंदोलन केंद्रातील भाजप सरकारने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा ते दिल्लीपुरते सीमित न राहता त्याची व्याप्ती देशभर पसरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला.

देशातील जनतेच्या पोटाची भूक भागविणारा शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. हे आंदोलन गांभीर्याने घेण्याची गरज आहे. दुर्दैवाने केंद्रातील भाजप सरकारने हे आंदोलन तेवढे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.

पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी देशाची अन्नाची गरज भागवितात. गहू व तांदळाचा पुरवठा या दोन राज्यांमधून होतो. याशिवाय अनेक देशांमध्ये या राज्यांमधील शेतमाल निर्यात होतो. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतमालाला चांगला  भाव मिळावा ही त्यांची मागणी रास्त असल्याचेही पवार म्हणाले.

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे समर्थन देत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. कार्यकर्त्यांनी शांतपणे आणि करोनाकाळातील मर्यादांचे पालन करून त्या दिवशी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पवार राष्ट्रपतींना भेटणार

शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे येत्या बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जावेत व त्यांच्या मागण्यांवर लक्ष वेधण्याकरिता पवारांसह विविध पक्षांचे नेते राष्ट्रपतींना भेटणार आहेत.

कृषी कायद्यात बदल होतील, पण तो रद्द नाही-चंद्रकांत पाटील

पुणे : सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून केंद्राने कृषी कायदा आणला आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. कायद्यात बदल केले जातील पण तो रद्द होणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कायदा रद्द करण्यासंदर्भात कोणाला राष्ट्रपतींना भेटायचे असेल तर त्यांनी भेटावे. देशात लोकशाही आहे, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावरही भाष्य केले.

काँग्रेसचा बंदला पाठिंबा

सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून निष्पन्न न झाल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला पुकारलेल्या ‘भारत बंद’ला प्रदेश काँग्रेस समितीने सक्रिय पाठिंबा दिला असून कार्यकर्त्यांंनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

बंदला शिवसेनेचा पाठिंबा

* मुंबई :  पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना आणि  देशव्यापी बंदलाही शिवसेना पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी रविवारी येथे केली.

* अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मागण्या आणि आंदोलनाविषयी चर्चा केली.

* विविध पक्षांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना खासदार राऊत म्हणाले, शेतकरी दिल्लीच्या वेशीवर कडाक्याच्या थंडीत सरकारी दडपशाहीची पर्वा न करता आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करीत आहेत.

* पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्याने देशाच्या अन्नधान्य उत्पादनात नेहमीच मोलाचे योगदान दिले. तोच शेतकरी केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज रस्त्यावर उतरला आहे.

* केंद्राने ११ दिवसांनंतरही या आंदोलनावर तोडगा न काढल्याने शेतकरी आंदोलकांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. हा बंद यशस्वी व्हावा, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज जगभरात जावा, हीच शिवसेनेची भावना आहे.

* महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने पंजाब हरयाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकत नाही. पण पंजाब-हरयाणाचा शेतकरी आंदोलनात उतरला, हे केंद्राचे अपयश आहे.

* करोना काळातही शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. शेतकरी जर मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील, तर जनतेने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे  उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले.