विनाफास्टॅग वाहनांनी संबंधित मार्गिकेचा वापर केल्यास दुप्पट टोल; वाहनकोंडी कमी होण्यास मदत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर आजपासून (१५ डिसेंबर) फास्टॅग योजना लागू केली जाणार आहे. या योजनेमुळे टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस  व झटपट होईल. मात्र वाहनांवर फास्टॅग नसेल आणि तरीही फास्टॅगच्या मार्गिकेतून जाणाऱ्या वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

सुरुवातीला टोल नाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच ही योजना असेल, तर उर्वरित मार्गिकांवर टोल भरण्यासाठी रोख रक्कमेची सुविधा असणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. याआधी १ डिसेंबरला योजना लागू केली जाणार होती.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या टोलनाक्यांवर वाहन चालकांना मोठय़ा रांगांना सामोरे जावे लागते. सध्या टोलनाक्यांवर एका मार्गिकेतून जाताना फास्टॅगची योजना, तर उर्वरित मार्गिकेतून जाताना रोख रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहन चालकांचा गर्दीच्या वेळेतील प्रवास अत्यंत धीमा होत होता. हे टाळण्यासाठी ‘वन नेशन वन फास्टॅग’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. टोलनाक्यांवरील सर्व मार्गिकांवर तर उर्वरित एकाच मार्गिकेवर रोख रक्कम भरण्याची सुविधा अंमलात आणली जाणार होती. मात्र १५ डिसेंबरपासून अंमलात येणाऱ्या योजनेत आता टोलनाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच फास्टॅग असेल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

* फास्टॅग मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो हवा

* एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येणार असून बचत खात्याला लिंक करता येईल.

* डेबिट-क्रेडीट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा

* टोल नाक्यावरून जाताना वाहन चालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागेल.

* फास्टॅग नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांपर्यंतच काम करणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन टॅग घ्यावे लागेल व नोंदणी करावी लागणार आहे.

फास्टॅगची उपलब्धता : वाहन चालकांना फास्टॅग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माय फास्टॅग अ‍ॅपवर उपलब्ध आहे. तर आयएचएमसीएल डॉट कॉम बेवसाईटवरही फास्टॅग मिळेल. याशिवाय भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कॉपरेरेशनच्या पेट्रोल पंपावरही टॅग मिळणार आहे. २२ बँकांच्या शाखांमध्येही याची सुविधा असेल. यात एसबीआय, आयसीआसीआय, अ‍ॅक्सिस बँकाच्या शाखांचा समावेश आहे. पेटीएम, अ‍ॅमेझानसारख्या ऑनलाइन पोर्टलवरही फास्टॅग मिळणार आहे. वाहनावर फास्टॅग बसवण्यात आल्यानंतर टोलनाक्यावर येताच तेथील सुसज्ज अशा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशनद्वारे टोलनाक्यांवर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनावरील टॅग वाचेल व टोलचे पैसे वाहनधारकाच्या खात्यातून जातील. पैसे खात्यातूच जाताच वाहनधारकाला नोंदणी असलेल्या मोबाइल क्रमांकावर त्याची माहिती मिळेल.

वाहनांवर फास्टॅग नसेल आणि तरीही फास्टॅगच्या मार्गिकेतून जात असाल तर दुप्पट टोल भरावा लागणार आहे. यासाठी फास्टॅग मार्गिकांवरही कर्मचारी तैनात असतील. वाहनावर टॅग नसेल, तर उपस्थित कर्मचारी दुप्पट टोल घेतील.

– राजीव सिंग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (मुंबई विभाग) महाव्यवस्थापक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fastag from today on toll lanes on national highway abn
First published on: 15-12-2019 at 01:25 IST