गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना
यापुढे शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परतावा व अन्य शिक्षणविषयक आर्थिक सवलती मिळण्यासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. शिक्षणातील आर्थिक सवलत योजनांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी आणि योग्य व पात्र व्यक्तीलाच त्याचा लाभ मिळावा, यासाठी आधार क्रमांक सादर करणे अनिवार्य करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने तशी अधिसूचना काढण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून विविध योजनांतर्गत देण्यात येणारे आर्थिक लाभ व सेवा या योग्य व्यक्तीलाच मिळाव्यात, त्यासाठी त्याची ओळख म्हणून आधार कार्ड पुरावा मानण्यासंबंधीचा २०१६ मध्ये कायदा करण्यात आला. या कायद्यांतर्गत ज्या योजनांसाठी आधार क्रमांक आवश्यक आहे, त्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
अनूसचित जातींच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, व्यावसायिक महाविद्यालयांशी सलग्न वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे, सैनिकी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन, आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी अनुदाने, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिक्षणासाठी परीक्षा शुल्क प्रदाने, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदाने, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क सवलत, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन इत्यादी योजनांच्या लाभासाठी आधार क्रमांक आवश्यक राहणार आहे.
या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी आधार कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्थात, आधार कार्ड नाही म्हणून या योजनांच्या लाभापासून कुणाला वंचित ठेवले जाणार नाही, त्यासाठी अन्य पुरावे सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यात मतदार
ओळखपत्र, पॅन कॉर्ड, वाहनचालक परवाना, राजपत्रित अधिकाऱ्याने दिलेले व्यक्तीचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँकेची पुस्तिका यांचा समावेश आहे. शासनाच्या योजनांचा लाभ योग्य व्यक्तीला मिळाला, त्यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी आधार कार्डची सक्ती नसली तरी
लाभार्थी व्यक्तीच्या ओळखीसाठी अधिकृत पुरावा म्हणून आधार कार्डची आवश्यकता आहे, असे सामाजिक न्याय विभागातील सूत्राकडून सांगण्यात आले.