प्रत्येक ‘आयपीएस’ अधिकाऱ्याचे मुंबईचा पोलीस आयुक्त होण्याचे स्वप्न असते. आज माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे भावनिक उद्गार मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी काढले. रविवारी सकाळी त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारताना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुंबईतील रस्त्यावरील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्धार मारिया यांनी या वेळी व्यक्त केला.
गेले १५ दिवस मुंबईचे आयुक्त कोण असणार, या चर्चेला शनिवारी रात्री पूर्णविराम मिळाला. राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख असलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक राकेश मारिया यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी निवड करण्यात आली. रविवारी सकाळी ११ वाजता त्यांनी आयुक्त कार्यालयात पदभार स्वीकारला.
वांद्रे येथील एक मुलगा ‘आयपीएस’ होऊन मुंबईचा पोलीस आयुक्त बनतो. हे स्वप्नवत असल्याचे सांगत अनेक दिग्गज पोलीस अधिकाऱ्यांनी या पूर्वी हे पद भूषविले असून, नव्या जबाबदारीचे भान मला आहे, असेही ते म्हणाले.
 देशांतर्गत दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, बालगुन्हेगारी, वरिष्ठ नागरिकांची सुरक्षितता आदी अनेक प्रश्नांचे आव्हान मुंबई पोलिसांपुढे आहे. या प्रश्नांना प्राधान्य देण्याबरोबरच रस्त्यावरील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला. मुंबईचा आयुक्त या नात्याने या आव्हानांना तोंड देण्यासाठी व्यूहरचना आखून ते सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू तसेच लोकांचे प्रश्न सोडविणारे, जनतेशी आपुलकीने वागणारे, पारदर्शक आणि मैत्रीपूर्ण सेवेचे पोलीस दल करण्याकडे आपला प्रयत्न राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
 ५७ वर्षीय राकेश मारिया १९८१ बॅचचे ‘आयपीएस’ अधिकारी आहेत. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त असताना १९९३ मध्ये मुंबई स्फोटाचे प्रकरण त्यांनी उघडकीस आणले होते. त्यांनतर त्यांनी पोलीस उपायुक्त (गुन्हे) आणि नंतर सहपोलीस आयुक्त (गुन्हे) या पदावर काम केले. २००३ मध्ये गेट वे ऑफ इंडिया तसेच झवेरी बाजार मध्ये झालेल्या स्फोटाची उकल करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण केल्याने  ओबामा यांनी मारिया यांना खास भोजनाचे आमंत्रण दिले होते.
काँग्रेसचा मारिया विरोध
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया यांच्या नियुक्तीला पोलीस दलातीलच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध असताना आता सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसनेही विरोधाचा सूर लावला आहे. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मारिया यांच्या नियुक्तीला जाहीर विरोध दर्शवला आहे. ही नियुक्ती करताना सेवाज्येष्ठतेऐवजी कार्यक्षमतेचा निकष लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र कार्यक्षमता हाच निकष असेल, तर संपूर्ण पोलीस दलाची कार्यक्षमता तपासावी लागेल, असे दलवाई म्हणाले. काँग्रेसने विजय कांबळे यांचे नाव मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी सुचवले होते. सेवाज्येष्ठता, पारदर्शक कारभार, स्वच्छ कारकीर्द अशा सर्व निकषांवर उतरले असतानाही राष्ट्रवादीने कांबळे यांना केवळ सूडाच्या राजकारणापोटी डावलले आहे, असा आरोप त्यांनी केला.
जावेद अहमदही नाराज
दरम्यान, विजय कांबळे यांच्या पाठोपाठ गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झालेले जावेद अहमद हेसुद्धा मुंबईच्या आयुक्तपदासाठी डावलले गेल्याने नाराज झाले आहेत. पोलीस दलात केवळ गुणवत्ता असून उपयोग नाही, तर राजकीय गॉडफादरची आवश्यकता असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या नाराजीमुळे ते राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.