शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २२ दुकाने खाक

गोरेगावच्या ‘टेक्निक प्लस वन’ इमारतीला लागलेल्या आगीत पाच जण ठार, तर नऊ जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी मालाड पश्चिम येथील सुमारे २२ दुकाने शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले. या आगीमुळे एस. व्ही. रोड तसेच साईनाथ रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मालाड पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळील साईनाथ रोडवरील एम. एम. मिठाईवाले यांचे दुकान आहे. या दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या दुकानांना मंगळवारी सकाळी ६.४५च्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे आठ बंब आणि पाण्याचे आठ टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ही दुकाने चिंचोळ्या गल्लीत असल्यामुळे प्रत्यक्ष आगीच्या ठिकाणी पोहोचण्यास जवानांना विलंब झाला. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. या ज्वाळांनी म्हणता म्हणता २२ दुकाने गिळंकृत केली. आगीची तीव्रता पाहून मालाड रेल्वे स्थानक परिसर रिकामा करण्यात आला. त्यामुळे सकाळी रेल्वेस्थानकाकडे निघालेल्या प्रवासी अडकून पडले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी १०.३०च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, त्यानंतर दुपारी दोनपर्यंत जवानांचे मदतकार्य सुरू होते. आग लागल्यानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे सायंकाळपर्यंत संपूर्ण परिसरातील दुकाने बंद होती. साईनाथ रोडवरील दुकानांमध्ये सकाळी १० नंतर ग्राहकांची मोठी वर्दळ असते. तसेच व्यापाऱ्यांचीही धावपळ सुरू असते. सुदैवाने या दुकानांना आग सकाळी ६.४५च्या सुमारास लागल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सकाळी ११च्या सुमारास आग लागली असती तर चेंगराचेंगरी होऊन मोठी जीवितहानी झाली असती, असे या परिसरातील एका दुकानदाराने सांगितले.

छोटी छोटी दुकाने

मालाड रेल्वे स्थानकाच्या अगदी समोरच चिंचोळ्या गल्लीत एकमेकांना खेटून ही दुकाने होती. दिल्ली हॉटेलच्या बाजूने सुरू झालेली ही चिंचोळी गल्ली मागच्या रोडवरील शांती स्वीट्सजवळ संपते. या गल्लीत धार्मिक साहित्य, अगरबत्ती, सौंदर्य प्रसाधने, बांगडय़ा, स्टीलच्या भांडय़ांची लहान दुकाने होती.

स्थानक परिसरात कोंडी

मालाड रेल्वे स्थानक परिसरातील आग लागलेले ठिकाण रोधके लावून बंद करण्यात आले होते. मालाड रेल्वे स्थानक परिसरातून जाणाऱ्या रिक्षा, बस नटराज मार्केटपर्यंतच सोडण्यात आल्या. त्यामुळे एस.व्ही. रोड व साईनाथ सबवे परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.