कल्याण-डोंबिवली पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वसंत भगत यांच्या मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमात रविवारी रात्री बारा वाजता डोंबिवलीतील म्हात्रेनगर भागात दोन गटांत हाणामारी होऊन त्याचे प्रत्यंतर गोळीबारात झाले. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
रोहित श्रीधर म्हात्रे, दिनेश नाडर, सतीश धनपुरे यांना अटक करण्यात आली आहे. रोहितने परवानाधारी बंदूकमधून गोळीबार केला आहे. त्यांच्याकडून लोखंडी सळई, दांडके जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये प्रिन्स परमार हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. रामनगरचे वरिष्ठ निरीक्षक विलास जाधव यांनी सांगितले, म्हात्रेनगरमध्ये रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू होता. या वेळी वाहन पार्किंगवरून रोहित व प्रिन्स गटात बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन रोहित गटाने प्रिन्स गटाला मारहाण केली. रोहितने दहशत माजविण्यासाठी बंदुकीतून हवेत गोळीबार केला व गाडीतून पळून गेले.
दरम्यान, डोंबिवली परिसरात लग्नाचा हंगाम सुरू आहे. रात्री दहानंतरही डीजे, नाचगाणी रात्री उशिरापर्यंत सुरू असतात तरीही पोलीस याविषयी कारवाई करीत नसल्याने हे प्रकार वाढत असल्याचे अनेक जाणकार नागरिकांनी सांगितले.