कैक वर्षांपासून केवळ इंग्रजी नावांनीच ओळखल्या जाणाऱ्या फुलपाखरांना अखेरीस मराठी नावे मिळाली असून त्याचे सचित्र पुस्तक राज्य जैवविविधता मंडळाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकामुळे २७७ फुलपाखरांचे प्रथमच मराठी नामकरण झाले आहे.

शनिवारी वन भवन, पुणे येथे राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव विकास खर्गे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यात आढळणाऱ्या २७७ फुलपाखरांची रंगीत छायाचित्रे, इंग्रजी नाव, मराठी नाव आणि थोडक्यात माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. यापूर्वी फुलपाखरांना केवळ इंग्रजी नावानेच ओळखले जायचे, पण ही उणीव आता जैवविविधता मंडळाच्या या पुस्तकामुळे दूर झाली आहे. फुलपाखरांना मराठी नावे देणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य असून, यापूर्वी केरळ राज्याने फुलपाखरांना स्थानिक नावे दिली आहेत. या कार्यक्रमास मंडळाचे सदस्य सचिव जीत सिंह आणि नामकरण समितीचे सदस्य उपस्थित होते.

supreme court ramdev
पतंजलीच्या फसव्या जाहिरातींप्रकरणी रामदेव यांच्या वकीलांवर न्यायमूर्तींचा संताप; म्हणाले, “आम्ही आता हात वर केलेत”
2024 25 is the last year for textbooks of I and II
राज्यात पहिली, दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष… आता होणार काय?
nagpur court marathi news, local self government body marathi news
स्वराज्य संस्थांच्या फलकांवर मराठीसह इतर भाषेचा वापर चुकीचा नाही, उच्च न्यायालयाचे एका प्रकरणात मत
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर

पक्षी, प्राणी यांच्यासाठी मराठी नावं असली तरी फुलपाखरांची ओळख मात्र इंग्रजी नावानेच होती. इंग्रज आमदनीत निसर्गप्रेमी अशा काही इंग्रज अधिकाऱ्यांनी भारतातील फुलपाखरांना कमांडर, सार्जन्ट, कार्पोरल अशी नावेदेखील दिली होती. पुढे या क्षेत्रातील अभ्यासकांनी इंग्रजी नावे दिली. मराठी साहित्यात किंवा ग्रामीण पातळीवरदेखील फुलपाखरांसाठी विशिष्ट नावे नव्हती.

डॉ. राजू कसंबे यांच्या फुलपाखरांवरील मराठी पुस्तकात ८० फुलपाखरांना मराठी नावं देण्यात आली होती. त्यामुळे जैवविधिता मंडळाने काही महिन्यांपूर्वी सर्वच फुलपाखरांच्या मराठी नावांसाठी अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमी संस्थांना आवाहन केले होते.

राज्यभरातून अनेक अभ्यासकांनी आणि २५ संस्थांनी यामध्ये भाग घेतला. त्यानंतर जैवविविधता मंडळाने त्याचे संकलन करून अंतिम नावे ठरवली आणि पुस्तिका प्रकाशित केली. यापुढे नीलायम, भिरभिरी, पवळ्या, रूपमाला, रुईकर, झिंगोरी, झुडपी, हबशी, हळदीकुंकू, ढवळ्या, भटक्या अशा विविध नावांनी ही फुलपाखरं ओळखली जातील.

या पुस्तकात सहा कुळांमध्ये २७७ फुलपाखरांची विभागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर या कुळांचेदेखील मराठी रूपांतर करण्यात आले. मुग्धपंखी (Riodinidae) कुंचलपाद (Nymphaliade) चपळ (Hesperiidae), निल  (Lycaenidae), पितश्वेत (Pieridae) आणि पुच्छ (Papiliondae) अशा सहा कुळांमध्ये सर्व फुलपाखरांचे वर्गीकरण केले आहे. जैवविधिता मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. जयंत वडतकर, हेमंत ओगले, दिवाकर ठोंबरे, डॉ. राजू कसंबे आणि अभय उजागरे यांच्या समितीने फुलपाखरांच्या मराठी नावांना अंतिम रूप दिले.