बाल संग्रहालयाद्वारे मूल्यशिक्षण

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त स्थापना

‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त स्थापना; २९ मार्चपासून खुले होणार

नमिता धुरी, मुंबई : मैत्री, शांतता, धाडस, संघटन कौशल्य, पर्यावरणप्रेम या मूल्यांची रुजवात शालेय विद्यार्थ्यांमध्ये करण्याच्या हेतूने फोर्ट येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त बाल संग्रहालय उभारण्यात आले आहे. २९ मार्चपासून खुल्या होणाऱ्या या संग्रहालयात ८ ते १४ वयोगटातील मुलांना प्रवेश मिळेल. यासाठी तिकीट आकारायचे की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

गेल्यावर्षी संग्रहालयामार्फ त शालेय विद्यार्थ्यांची निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील २५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. यावेळी त्यांना संग्रहालयातील काही वस्तूंची निवड करण्याची संधी देण्यात आली. अनेकदा शाळेत अभ्यास के ला नाही किंवा नियम मोडले म्हणून शिक्षा टाळण्यासाठी विद्यार्थी शिक्षकांशी खोटे बोलतात. मात्र एका विद्यार्थ्यांने खरे बोलून शिक्षकांचे मन जिंकले. या अनुभवातून त्याने धाडसाचे प्रतीक म्हणून झाशीच्या राणीचे आणि लोकमान्य टिळकांचे चित्र, तलवार आणि गांधीजींच्या चरख्याची बाल संग्रहालयासाठी निवड केली.

शांततेचा संदेश देण्यासाठी ध्यानधारणा करणारे गौतम बुद्ध, तिबेटी साधू, पांढरे हंस इत्यादी प्रतीके विद्यार्थ्यांनी निवडली. मैत्रीचे महत्त्व सांगण्यासाठी बैलगाडी हाकणारा माणूस, कोकरू घेऊन बसलेली मुले या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. नृत्य करणारे माडिया आदिवासी, गावातील पंचायत, राजदरबार, सप्तरंगी इंद्रधनुष्य यांच्या माध्यमातून संघटन कौशल्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. येथे एका चित्रात राक्षस माणसांना गिळताना दिसतो. हा राक्षस त्सुनामीचे प्रतीक म्हणून प्रदर्शनात मांडण्यात आला आहे. माणसाने निसर्गाची हानी केली तर त्याचा कोप होतो हे दर्शवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. संग्रहालय बनत असताना आंबा आणि पामचे वृक्ष अनेक वर्षे तोडण्यात आले नाहीत. हे पर्यावरण प्रेमाचे प्रतीक आहे. बालकांच्या आवडी-निवडींचा विचार करून संग्रहालय साकारण्यात आले आहे.

इतिहास संशोधन, कठपुतळ्यांचा खेळ

संग्रहालयाच्या आवारात आफ्रिकन बाओबॅब नावाचे शेकडो वर्षे जुने झाड आहे. त्या खाली बसून लहान मुलांना माहिती देण्यात येईल. शेजारी एका राखीव जागेत मुलांना इतिहास संशोधनाचे प्रात्यक्षिक दाखवण्याची सोय आहे. संग्रहालयाच्या बांधकामावेळी मुळापासून उखडून काढलेल्या औषधी वनस्पतींचे पुनरेपण करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना कठपुतळ्यांचा खेळ आणि माहितीपट दाखवण्यासाठी अ‍ॅम्फी थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे. बँक ऑफ  अमेरिकाच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे संग्रहालय मुंबईतील पहिले बाल संग्रहालय आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: First children museum at chhatrapati shivaji maharaj vaastu sangrahalaya

ताज्या बातम्या