राज्यासह देशभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना सोमवारी स्वाइन फ्लूने मुंबईतील आपला पहिला बळी घेतला. कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणि अंधेरी पश्चिमेकडील राहणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीचे निधन स्वाइन फ्लूमुळे झाले. त्याचबरोबर सोमवारच्या दिवसात मुंबईत स्वाइन फ्लूचे सात रुग्ण आढळले असून ते शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे संबंधित रुग्णालयांनी स्पष्ट केले.
मुंबईत आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ११४ रुग्ण सापडले आहेत. यापैकी सात रुग्ण सोमवारी रुग्णालयांत दाखल झाले. या सातपैकीही पाच रुग्ण पश्चिम उपनगरांतील अंधेरी, गोरेगाव व कांदिवली येथे राहणारे असून इतर दोन भांडुप आणि घाटकोपर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, मुंबईतील ११४ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे सोमवारी नोंदवण्यात आला. या ५० वर्षीय रुग्णाला ११ फेब्रुवारी रोजी जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. येथे उपचार सुरू असताना त्याला श्वासोच्छ्वास करताना त्रास जाणवू लागला आणि आकडी आल्याने सोमवारी त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, आतापर्यंत मुंबईबाहेर देशभरात स्वाइन फ्लूचे ४७ रुग्ण आढळले असून त्यापैकी ८ जण दगावले आहेत. मुंबईबाहेर देशभरात सोमवारी तीन रुग्ण दाखल झाले असून आसाम, पालघर आणि जयपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2015 रोजी प्रकाशित
स्वाइन फ्लूचा मुंबईत पहिला बळी
राज्यासह देशभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना सोमवारी स्वाइन फ्लूने मुंबईतील आपला पहिला बळी घेतला.

First published on: 17-02-2015 at 04:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First death of swine flu in mumbai