गेल्या दोन वर्षांत पाच हजारांहून अधिक तरुण महामार्गावर होणाऱ्या अपघातांत मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महामार्ग पोलिसांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
याबाबत माहिती देताना महामार्ग पोलीस अधीक्षक रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, तरुणांमध्ये वेगाने वाहन चालविण्याची वृत्ती, नियम न पाळण्याची मानसिकता यामुळे अपघात वाढत आहेत. २०११ साली ६८,४३८ अपघात झाले. त्यात १३,०५७ जण मृत्यूमुखी पडले तर २४,८५६ लोक जखमी झाले. २०१२ या वर्षांत नोव्हेंबपर्यंत ५९,५१० अपघात झाले होते. त्यात ११,७८१ जण मरण पावले. या दोन वर्षांत एकूण २४,८३८ लोक मृत्युमुखी पडले असून त्यात तरुणांची संख्या पाच हजारांपेक्षा अधिक असल्याचे करंदीकर यांनी सांगितले.
अपघातात मरण पावलेले तरुण हे १५ ते ४४ वर्ष वयोगटातील आहेत. ही संख्या तुलनेने कमी असली तरी एक कमावता तरूण गमावल्याने त्या कुटुंबावर मोठा आर्थिक संकट कोसळते आणि परिणामी देशाच्या जीडीपीवरही परिणाम होत असतो. त्यामुळे तरुणांचे अपघात रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचेही करंदीकर यांनी सांगितले. तरुणामधील वाढत्या अपघातांची दखल शासनानेही घेतली असून तरुणांमध्ये अपघातांविषयी जनजागृती करणाऱ्यांना पाच लाखांचे बक्षिसही शासनाने जाहीर केले
आहे.नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याची बाब समोर आली आहे. २०११ या वर्षांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात ५८ लाख ४१ हजार प्रकरणे नोंजविण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ७० कोटी ४४ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.