जास्त मनुष्यबळ निर्माण होत असल्याने पाच वर्षांसाठी बंदी

रसिका मुळ्ये, मुंबई</strong>

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असला तरीही गरजेपेक्षा जास्त मनुष्यबळ निर्माण होत असल्यामुळे औषधनिर्माणशास्त्राची पदवी (बी.फार्म) आणि पदविका (डी.फार्म) अभ्यासक्रमाची महाविद्यालये सुरू करण्यास ‘औषधनिर्माणशास्त्र परिषदे’ने (पीसीआय) बंदी घातली आहे. कोणत्याही राज्यात पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०२०-२१) पाच वर्षांसाठी नवी महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत.

देशभरात सगळीकडेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची स्थिती डबघाईला आल्यानंतर संस्थाचालकांनी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोर्चा वळवला. गेल्या चार ते पाच वर्षांपासून देशभरात औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांची महाविद्यालये मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या संस्थांना आलेल्या फुगवटय़ाप्रमाणे औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला आलेला फुगवटा आटोक्यात आणण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र परिषदेने पावले उचलली आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०२०-२१) पाच वर्षांच्या कालावधीसाठी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या नव्या महाविद्यालयांना परवानगी न देण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. ईशान्य भारतातील राज्यांना फक्त या निर्णयातून सवलत देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचा औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद वाढताना दिसतो आहे. गेल्या तीन वर्षांची प्रवेशाची आकडेवारी पाहता या अभ्यासक्रमांसाठी रिक्त जागांचे प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. देशभरातील पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता दोन वर्षांत ३२ हजारांनी वाढून सध्या १ लाख १९ हजार ८७० झाली आहे. पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता १ लाख ६ हजार ४९३ पर्यंत पोहोचली आहे. राज्यातही गेली चार वर्षे औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या महाविद्यालयांची संख्या भरमसाट वाढली. गेल्या वर्षी पदवी अभ्यासक्रमाची ४२ तर यंदा ५६ नवी महाविद्यालये सुरू झाली. पदविका अभ्यासक्रमाचीही ५२ नवी महाविद्यालये सुरू झाली. महाविद्यालयांची वाढती संख्या, त्यातून निर्माण होणारे मनुष्यबळ या तुलनेत रोजगाराच्या संधी मात्र पुरेशा नसल्याचे समोर आले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडील नोंदीनुसार दरवर्षी पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ३० टक्के विद्यार्थ्यांनाच रोजगार मिळू शकत असल्याचे दिसते. वाढते मनुष्यबळ आणि घटत्या नोकऱ्या यामुळे नवी महाविद्यालये सुरू करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ‘नवी महाविद्यालये सुरू होतात, मात्र त्या तुलनेने पात्रताधारक शिक्षक पुरेसे नाहीत. शैक्षणिक गुणवत्ताही घटत आहे,’ असे परिषदेने   नमूद केले आहे.

पुढील वर्षांपासून नवी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यासही अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मनाई केली आहे. त्यानंतर आता औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या मनुष्यबळ निर्मितीवरही नियंत्रण येणार आहे.

कारण काय?

* सध्याचा लोकसंख्येच्या तुलनेत देशातील औषधनिर्माण शास्त्रातील मनुष्यबळ पुरेसे आहे.

* गेल्या दशकात झपाटय़ाने वाढलेल्या महाविद्यालयांच्या तुलनेत पुरेसे पात्र शिक्षक उपलब्ध नाहीत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

* उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या वेतनाच्या नोकऱ्या शासकीय किंवा खासगी क्षेत्रात मिळत नाहीत