भाभा अणू संशोधन केंद्रात १४व्या शतकातील शिलालेख

मानखुर्द येथील भाभा अणू संशोधन केंद्रात (बीएआरसी) ‘बिंबस्थाना’चा म्हणजेच चौदाव्या शतकातील मुंबईच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा शिलालेख आढळला असून यात तत्कालीन प्रशासकांबाबतची महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. मुंबई विद्यापीठाचा बहिशाल शिक्षण विभाग आणि पुरातत्त्व केंद्रातर्फे यंदापासून हाती घेतलेल्या मुंबई-साष्टीच्या पुरातत्त्वीय अवशेषांच्या शोधनकार्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यात शिल्पे, मूर्ती, शिलालेख, प्राचीन गुंफा, गधेगळ, वीरगळ सापडले असून यात मुंबई शहराच्या प्राचीन नागरी इतिहासातील रहस्ये दडली आहेत. या शोधनकार्यातील अनेक ऐतिहासिक दुव्यांचा आज मुंबई विद्यापीठात होणाऱ्या कार्यशाळेत उलगडा होणार आहे.

छोटय़ा छोटय़ा बेटांना एकत्र करून तयार झालेल्या मुंबईच्या भूभागावर प्राचीन काळापासून अनेक आक्रमणे झाली. यापैकी अनेक आक्रमणांच्या अस्तित्व खुणा शहरात आढळतात. अशा खुणांचा माग काढत मुंबईचा प्राचीन इतिहास उलगडण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा बहिशाल विभागामार्फत सध्या संशोधन सुरू आहे. यात मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागाच्या संचालिका मुग्धा कर्णिक, माहिती प्रकल्पाचे संशोधक डॉ. सुरज पंडित, डॉ. कुरूश दलाल, डॉ. अभिजीत दांडेकर, डॉ. प्राची मोघे, ‘लोकप्रभा’चे संपादक विनायक परब आदी संशोधकांचा समावेश आहे.

या संशोधनात विशेषत पूर्वीच्या साष्टी या भागावर लक्ष देण्यात आले असून भाभा अणू संशोधन केंद्राचा भागही यात येतो. त्यामुळे कुतूहलाने बहिशाल विभागाच्या संचालिका मुग्धा कर्णिक यांनी भाभा अणू संशोधन केंद्रातील हॉर्टिकल्चर विभागाचे विभागप्रमुख डॉ. सी. के. साळुंखे यांना केंद्रात काही ऐतिहासिक अवशेष सापडले आहेत का? अशी विचारणा केली होती. साळुंखे यांनी याबाबत दुजोरा दिला असता तेथे कर्णिक यांच्यासह शोधनकार्यातील संशोधकांनी केंद्राला भेट दिली. तेव्हा त्यांना एक पुरातन शिलालेख व एक मंदिरांमध्ये वापरण्यात येणारे शिखर आदी शिल्पे सापडली.

काय सांगतो शिलालेख?

  • ‘बीएआरसी’त सापडलेल्या १४व्या शतकातील या शिलालेखावर कार्तिक शुद्ध द्वादशी, स.का. संवत १२९० अशी तारीख आहे.
  • दिल्लीच्या सुलतानाने मुंबईच्या तत्कालीन प्रशासकाला लिहिलेला हा करार असावा. त्याकाळी गुजरात भागात असलेला मोहम्मद बिन तुघलकाचा काका फिरोजशहा तुघलक याने त्या काळी मुंबई भागात असलेला बिंब राजा हंबीर राव यास मुंबई विभागाची सूत्रे सुपूर्द करण्याच्या करारासंबंधीचा हा शिलालेख आहे.
  • मुंबईच्या या जागेस कोकण-बिंबस्थान म्हणून संबोधले असून याचाच अपभ्रंश होत ‘मुंबई’ असे नाव पडले असावे असा कयास आहे. मरोळ, नानले, देवनारे (आत्ताचे देवनार) या मुंबईतील गावांचाही शिलालेखात उल्लेख असून साष्टीशी याचा संबंध असल्याचेही नमूद करण्यात आले. असे या शिलालेखाचे वाचन केलेले डॉ. सुरज पंडित यांनी सांगितले.