शिवसेना, भाजप व रिपाइं युतीची समन्वय समिती  *  मुंडे- उध्दव ठाकरेंची प्रदीर्घ चर्चा

लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीची शक्यता गृहीत धरुन भाजपने तयारी सुरु केली आहे. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मंगळवारी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यात शिवसेना, भाजप व रिपब्लिकन युतीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन दर पंधरवडय़ाला एक बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

महालक्ष्मी रेसकोर्सवर उद्यानच व्हावे, टर्फ क्लबला मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी मुंडे यांनी केली असून उद्यानाला नाव कोणाचे द्यावे, हे चर्चेने ठरविता येईल, पण शिवसेनाप्रमुखांचे स्मारक मुंबईत झालेच पाहिजे, असे स्पष्ट केले.

उध्दव आणि राज ठाकरे यांच्यात मैत्रीचा पूल बांधणार, असे वक्तव्य भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी नुकतेच केले होते. मात्र, गडकरी यांचे प्रयत्न सुरू होण्याआधीच मुंडे यांनी उध्दव ठाकरेंची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. या भेटीत मनसेबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, पण आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीनिमित्ताने युतीची व्यूहरचना ठरविण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले. स्थापन करण्यात येणाऱ्या  समन्वय समितीमध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे व फडणवीस या तिघांचा समावेश आहे. तर शिवसेना व रिपब्लिकन पक्षाकडून त्यांच्या नेत्यांची नावे ठरविली जातील, असे मुंडे यांनी सांगितले. शिरुरचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांना मुंडेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.

रेसकोर्सच्या जागी उद्यानच हवे!

मूठभर धनिकांची चैन व हौस भागविण्याकरिता रेसकोर्सचा वापर करणे योग्य नसून तेथे सर्वसामान्य मुंबईकर आणि पर्यटकांसाठी सर्वोत्तम दर्जाचे उद्यान विकसित केले पाहिजे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कोठे करायचे किंवा उद्यानाला कोणाचे नाव द्यायचे, यावर चर्चा करता येईल. बाळासाहेबांचे कार्य एवढे मोठे आहे, की त्यांच्या नावाला कोणाचाही विरोध असता कामा नये, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

दोन आमदार संपर्कात

सत्ताधारी पक्षातील पश्चिम महाराष्ट्रातील दोन विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात असून निवडणुका जशा जवळ येतील, तसा त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल, असे मुंडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरविले जाणार आहे. त्यात छगन भुजबळ यांचेही नाव असून यासंदर्भात विचारता ‘भुजबळ यांना पक्षाने लोकसभेत पाठवू नये, ते आगामी निवडणुकांनंतर विरोधी पक्षनेते म्हणून चांगली जबाबदारी पार पाडतील, भुजबळ आम्हाला येथे हवे आहेत.’ अशी टिप्पणी मुंडे यांनी केली.