वन विभागाकडून गुन्हा दाखल; एकाला अटक, इतरांचा शोध सुरू
मुंबई : तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात रविवारी २५-३० दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. तुंगारेश्वर अभयारण्यात मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवरील वन विभागाचे फाटक खुलण्यापूर्वीच हे मोटरसायकस्वार अभयारण्यात बेकायदा घुसले होते. या प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीस अटक केली आहे. तसेच इतर दुचाकीस्वारांचा शोध सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी साधारण साडेसातच्या सुमारास दोन-तीनच्या समूहाने अनेक मोटरसायकलनी तुंगारेश्वरमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सर्व मोटरसायकलस्वार शिव मंदिरापाशी एकत्र जमल्याचे तेथे पक्षी निरीक्षणासाठी आलेल्या पर्यावरणप्रेमीने पाहिले. मोटरसायकल डर्ट ट्रॅकवर ज्या पद्धतीने दुचाकी दामटतात, अगदी त्याच पद्धतीने प्रचंड वेगाने, धुळीचे लोट उडवत जाणाऱ्या या मोटरसायकलस्वारांचा माग त्याने घेतला. त्यानंतर सुमारे दोन तास सुरू असलेला दुचाकीस्वारांचा धुमाकूळ या पर्यावरणप्रेमीने कॅमेऱ्यात बंद केला. गेल्या दोन दिवसांत ही चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात प्रसारित झाली.
तुंगारेश्वर अभयारण्याच्या वन कर्मचाऱ्यांनी या चित्रफितीच्या आधारे मोटरसायकलस्वारांचा शोध घेतला. तुंगारेश्वर येथील वन विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एका दुचाकीस्वारास अटक करण्यात आली असून, मोटरसायकल क्लबचा शोध सुरू असल्याचे वनाधिकारी दिलीप तोंडे यांनी सांगितले. अटक केलेला दुचाकीस्वार हा त्या समूहाचा म्होरक्या नसल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. वन्यजीव अभयारण्यात ताशी २० किमीपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवण्यास मनाईच्या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आणि अभयारण्यात बेकायदा प्रवेश करणे या कलमांखाली मोटरसायकलस्वारांच्या समूहावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाटक उघडण्यापूर्वी या दुचाकीस्वारांनी अभयारण्यात प्रवेश केल्याचे प्रथमदर्शनी निर्दशनास आल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुंगारेश्वरमध्ये प्रत्येक रविवारी मोटरसायकलस्वार हमखास येत असतात. सातिवली येथील फाटक १० नंतर खुले होते. मोटरसायकलस्वार सात-साडेसातच्या सुमारास अभयारण्यात येतात आणि फाटक उघडण्यापूर्वी बाहेर पडतात. या रविवारीदेखील सातिवली येथूनच दुचाकीस्वारांनी अभयारण्यात प्रवेश केल्याची माहिती मिळते. अभयारण्यात बेकायदा प्रवेश करून दुचाकींच्या मोठय़ा आवाजामुळे ध्वनिप्रदूषणातदेखील वाढ होत असल्यामुळे त्या अनुषंगानेदेखील कडक कारवाई करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून केली जात आहे. गेल्या काही वर्षांत मोठय़ाने आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांचे समूह अनेक ठिकाणी भटकंती करताना दिसतात. अशा समूहांनी आता अभयारण्यातदेखील धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यामुळे वन्यजीवांचा धोका वाढल्याबद्दल वन्यजीवतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली.
धार्मिक स्थळ, वाढती गर्दी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता
तुंगारेश्वर अभयारण्यातील शिव मंदिरामुळे येथे कायमच भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. तुंगारेश्वर आणि संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मागील वर्षी तयार केलेल्या अहवालात दोन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र त्यावर अजून अंमलबजावणी झालेली नाही. मोटरसायकलस्वारांच्या धुमाकुळीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.