मुंबई : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष, राजीव गांधी यांच्या पंतप्रधान कार्यकाळात ज्यांचे या क्षेत्रातील योगदान विशेष नावाजले गेले, असे ‘अ‍ॅप्लॅब इंडिया’ या विख्यात कंपनीचे संस्थापक-प्रवर्तक प्रभाकर देवधर शनिवारी मुंबईतील त्यांच्या कार्टर रोड येथील निवासस्थानी निवर्तले. ते ८९ वर्षांचे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात भारताला नावारूपाला आणण्यात श्री. देवधर यांचा महत्त्वाचा वाटा होता. या क्षेत्रात मराठी माणसाची नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवण्याचे श्रेय श्री. देवधर यांस निर्विवादपणे दिले जाते. या विषयाशी संबंधित तब्बल ६५० उपकरणे, उत्पादने त्यांनी निर्मिली. राष्ट्रीय स्तरावर त्यांचे कार्यकर्तृत्व विविध पुरस्कारांनी गौरवले गेले. तथापि, इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या निधनाचे वृत्त फार कमी जणांस कळाले.

श्री. देवधर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील नूतन मराठी विद्यालयात झाले. त्यांनी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यांनी सुरुवातीला टाटा मूलभूत संशोधन संस्थेत आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) अधिपत्याखालील प्रयोगशाळेत ‘मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स’ विभागात काम केले. त्यांनी १९६२ मध्ये संशोधन आणि विकास क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळा स्थापन केली. त्यानंतर १९६४ मध्ये त्यांनी संशोधनावर आधारित ऊर्जाविषयक यंत्रांचे उत्पादन आणि विक्री सुरू केली.

हेही वाचा >>>सगेसोयऱ्यांची व्याख्या न्यायालयात टिकणार नाही’

श्री. देवधर यांनी स्थापन केलेल्या ‘अ‍ॅप्लॅब’ या कंपनीने बँकांसाठी एटीएम आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठीची यंत्रे, स्वयंचलित पेट्रोलपंप आणि केबलमधील दोष शोधणारी यंत्रे विकसित केली. औद्याोगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबरोबरच त्यांनी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्षपद १९८६ ते १९८८ या काळात भूषविले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे सल्लागार म्हणून १९८८ ते १९९० दरम्यान त्यांनी काम पाहिले. ते १९९२-९३ भारत सरकारच्या प्रसारण समितीचे अध्यक्ष होते.

कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि दूरचित्रवाणी या माध्यमांचा वापर केला. जेरुसलेम (इस्रायल) येथे १९९६ मध्ये भरलेल्या जागतिक मराठी परिषदेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तसेच जागतिक मराठी अकादमीचे ते १९९७ ते १९९९ दरम्यान अध्यक्ष होते. त्याच कालावधीत ते महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचेही अध्यक्ष होते. इलेक्ट्रॉनिक्स विषयावर भाषणे आणि लेखांद्वारे प्रबोधन करणाऱ्या श्री. देवधर यांनी १९७९ मध्ये एक पुस्तक लिहिले. त्याचबरोबर दिल्लीतील अनुभवावर आधारित ‘कॅपिटल पनिशमेंट’, दूरचित्रवाणीचा शैक्षणिक उपयोग करण्यासाठीचे ‘थर्ड पेरेंट’, आणि ‘इज एनिवन आउट देअर’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former chairman of electronic commission prabhakar deodhar passed away amy
First published on: 28-01-2024 at 06:49 IST