बिहारमधील पोलीस शिपायाची हत्या करणाऱ्या चौकडीस शनिवारी पहाटे ठाणे ग्रामीण पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात अटक केली आहे. गुन्ह्य़ासाठी पिस्तूल मिळविण्याच्या प्रयत्नात त्यांनी हे कृत्य केले होते. हे चौघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनाचे चार तसेच जबरी चोरी व बेकायदेशीरपणे हत्यार बाळगण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अतिकुमार झा, नवनीतकुमार सिंग, देवा पंजीयार न रोशनकुमार पंजीयार अशी या आरोपींची नावे आहेत.
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्य़ात रोसडा पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत गंगेश कुमार यांची २२ डिसेंबर रोजी गोळी मारून हत्या करण्यात आली होती. बिहार आणि उत्तर प्रदेशमधील विशेष पोलीस पथके देशभर मारेकऱ्यांचा शोध घेत होती. गंगेश कुमार यांची हत्या केल्यानंतर मारेकरी शिर्डीला आले होते. पैसे संपल्याने त्यांनी एका परिचितास एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. भिवंडी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातील हा क्रमांक होता. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही माहिती उत्तर प्रदेशमधील पोलिसांना दिली. मात्र पोलीस येण्यापूर्वीच आरोपी बँकेतून निसटले होते. मात्र शनिवारी पहाटे कल्याण स्थानकातून पाटणा येथे जाण्याच्या तयारीत असताना त्यांना अटक करण्यात आली. गंगेश कुमार यांची हत्या केल्याची कबुली या चौकडीने पोलिसांना दिली आहे.