scorecardresearch

लोकल प्रवासात आजपासून मोफत करमणूक

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीत सध्या १६५ लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात असून यातील १० लोकलमध्ये यंत्रणा बसवण्यात आली आहे.

लोकल प्रवासात आजपासून मोफत करमणूक

मुंबई : लोकल प्रवासात प्रवाशांची करमणूक होण्यासाठी मध्य रेल्वे आणि एका खासगी कंपनीमार्फत कंटेंट ऑन डिमांडअंतर्गत वायफाय, मोबाइल अ‍ॅपची सुविधा देण्यात येणार आहे. या वायफायद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार असून यात विविध करमणूक उपलब्ध असेल. हे वायफाय प्रवाशांना प्रवासात अमर्यादित वापरता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. या सुविधेचा शुभांरभ शुक्रवारपासून मध्य रेल्वेवर करण्यात येणार आहे.

या सेवेमुळे प्रवासादरम्यान आपल्या मोबाइलवर डाऊनलोड केलेल्या अ‍ॅपमधून आवडीचे चित्रपट, गाणी, मालिका, क्रिकेट सामने पाहण्यासाठी प्रवाशांना त्यांच्या मोबाइलमधील इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही. विना इंटरनेट लोकलमध्ये प्रवासी करमणूक पाहू शकतील. लोकल डब्यात उपलब्ध केलेल्या वायफायद्वारे ही सेवा उपलब्ध असणार आहे. वायफायला एक पासवर्डही असेल. ही सुविधा मोफत असणार आहे. एका खासगी कंपनीला याचे काम दिले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीत सध्या १६५ लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात असून यातील १० लोकलमध्ये यंत्रणा बसवण्यात आली आहे. तर अन्य लोकलमध्ये बसवण्याचे काम सुरू आहे. करोनामुळे हे काम रखडले होते. जुलै २०२१ पासून ही सेवा उपनगरीय प्रवाशांसाठी सुरू केली जाणार होती. याची कुर्ला कारशेडमध्ये चाचणीही करण्यात आली आहे. आता मात्र या कामाला वेग आला असून शुक्रवारपासून नवीन सुविधा प्रवाशांसाठी दिली जाणार आहे. यातून मध्य रेल्वेला वर्षांला १ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार आहे. ‘कंटेंट ऑन डिमांड’अंर्तगत रेल्वेच्या डब्यात मीडिया सव्‍‌र्हर यंत्रणा बसविली जात असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-02-2022 at 00:57 IST

संबंधित बातम्या