मुंबई : उकाडय़ाने हैराण झालेल्या प्रवाशांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यास पसंती दर्शवली असली आहे. मात्र, अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. एप्रिलमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर तिकीट तपासनीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाई वातानुकूलित लोकलमध्ये २,७७८ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या मुख्य मार्गावर १९ फेब्रुवारीपासून नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात आल्या. अशा ३४ वातानुकूलित फेऱ्यांची भर पडली. याआधी सीएसएमटी ते कल्याण मार्गावरच दहा वातानुकूलित लोकल फेऱ्यांची सेवा होती. तर सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव या हार्बवर १६ फेऱ्या चालविण्यात येत होत्या. नवीन फेऱ्यांमुळे एकूण वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ६० झाली. तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान २० लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहेत.
मार्चपासून वाढलेल्या उकाडय़ामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वेवरील काही वातानुकूलित लोकल फेऱ्यांना गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीत काही प्रवासी विनातिकीट प्रवास करत आहेत. पश्चिम रेल्वेवरील तिकीट तपासनीस, तसेच रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत १ ते २७ एप्रिल दरम्यान १,५८६ प्रवाशांकडे तिकीट नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून पाच लाख ८५ हजार ५४० रुपये दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वेनेही ८ ते २३ एप्रिलपर्यंत वातानुकूलित लोकलमधील विनातिकीट प्रवाशांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. यामध्ये एकूण १,१९२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून चार लाख ९१ हजार २७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ८ एप्रिलला विनातिकीट प्रवास करणाऱ्या ९३ प्रवाशांना पकडले. २२ एप्रिलला १२५ प्रवाशांवर, तर २३ एप्रिलला १०२ प्रवाशांवर कारवाई केली आहे.
वातानुकूलित लोकलला वाढता प्रतिसाद
एप्रिलमध्ये सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळादरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूण ४२ हजार ७७५ तिकिटांची विक्री झाली आहे. दररोज सरासरी एकूण १,५८४ तिकीट विक्री होत आहे. सीएसएमटी ते पनवेल दरम्यान एकूण १,६२० तिकिटांची विक्री झाली असून दररोज सरासरी ६० तिकिटांची विक्री झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. हार्बरवरील या सेवेला काहीसा अल्प प्रतिसाद मिळत आहे. सीएसएमटी ते गोरेगाव वातानुकूलित लोकलचे दररोज सरासरी १२३ तिकिटांची विक्री होते.
पश्चिम रेल्वेवरही एप्रिलमध्ये एकूण ४७ हजारपेक्षा जास्त तिकीट आणि ११ हजार १५९ पासची विक्री झाली आहे. याद्वारे दोन कोटी ८० लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. १ एप्रिलला १,७९६ तिकिटांची विक्री झाली, तर २७ एप्रिलला २,४२२ तिकीट विक्री झाल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली.