उच्च न्यायालयाचे मत; तरुणाला जामीन नाकारला

मुंबई : मुलीचे मुलाशी मैत्रीचे संबंध आहेत याचा अर्थ मुलाने तिची शारीरिक संबंध ठेवण्यास संमती आहे हे समजू नये, किंबहुना अशी मैत्री मुलाला मुलीवर बळजबरी करण्याचा परवाना देत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला गर्भवती करणाऱ्याला अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

 लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी उपरोक्त मत नोंदवून त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

 तरुणीच्या तक्रारीनुसार, तिचे आरोपीशी मैत्रीचे संबंध होते. परंतु लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्यावर बळजबरी केली. ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला, तर तक्रारदार तरुणीच्या संमतीनेच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा दावा आरोपीने अटकपूर्व जामिनाची मागणी करताना केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 न्यायालयाने मात्र आरोपीचा दावा फेटाळला. तसेच मुलीचे मुलाशी मैत्रीचे संबंध आहेत याचा अर्थ मुलाने तिची शारीरिक संबंध ठेवण्यास संमती आहे हे समजू नये, असे स्पष्ट केले. शिवाय शारीरिक संबंधांना तक्रारदार तरुणीने संमती देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला होता की नाही हे तपासण्यासाठी आरोपीच्या कोठडी चौकशीची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने म्हटले व आरोपीची याचिका फेटाळली.